नवी मुंबईत ‘आनंदी दिवाळी, सुरक्षित दिवाळी’ मोहीम

नवी मुंबईत ‘आनंदी दिवाळी, सुरक्षित दिवाळी’ मोहीम
Published on: 

अग्निशमन दलाकडून सुरक्षेचे धडे
वाशी, ता. ८ (बातमीदार) : दिवाळीचा उत्साह सर्वत्र सुरू असताना फटाक्यांमुळे आगीच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाने ‘आनंदी दिवाळी, सुरक्षित दिवाळी’ मोहीम राबवली आहे. नागरिकांनी फटाके फोडताना आवश्यक खबरदारी घ्यावी, तसेच विद्युत रोषणाई करताना सुरक्षिततेचे नियम पाळावेत, यासाठी अग्निशमन जवानांकडून सोसायट्यांमध्ये जाऊन नुकतीच जनजागृती करण्यात आली. माहितीपत्रकांचे वाटप आणि समाजमाध्यमांद्वारेही नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना दिल्या गेल्या.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अग्निशमन विभागप्रमुख तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम सुरू आहे. उपमुख्य अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांच्यासह अग्निशमन केंद्र अधिकारी आणि जवान नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत.

फटाके फोडताना सुती कपडे वापरावेत, लहान मुलांना मोठ्यांच्या देखरेखीखालीच फटाके फोडू द्यावेत. मोकळ्या जागेतच फटाके फोडावेत. घर, झाडे, विद्युत तारा आणि ज्वलनशील वस्तूंपासून सुरक्षित अंतर ठेवावे. फटाके पेटविण्यासाठी लांब अगरबत्ती किंवा मेणबत्तीचा वापर करावा. खबरदारी म्हणून जवळ पाणी किंवा वाळूची बादली ठेवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

घरामध्ये, वाहनतळात, इमारतीच्या जिन्यांत तसेच गॅस पाइपलाइन आणि विद्युत तारांजवळ फटाके फोडू नयेत. न फुटलेले फटाके पुन्हा पेटवू नयेत. रॉकेट लोकवस्ती किंवा घरांच्या दिशेने जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. तसेच विद्युत रोषणाई करताना ओव्हरलोडिंग टाळून प्रशिक्षित इलेक्ट्रिशियनकडूनच जोडणी करून घ्यावी, असे आवाहन अग्निशमन दलाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.