फुलांच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या

फुलांच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या
Published on: 

फुलांच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या
पावसामुळे आवक घटल्याने भावात वाढ
सकाळ वृत्तसेवा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : दिवाळीनिमित्त मुंबईतील दादर फूल मार्केट आणि इतर बाजारपेठांमध्ये फुलांसह सणाच्या खरेदीसाठी रविवारी (ता. ८) मुंबईकरांची तुफान गर्दी उसळली आहे. दादर पश्चिम येथील फूल बाजार, रानडे रोड तसेच हिंदमाता परिसरामध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिवसभर पाहायला मिळाली. लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी एकाच दिवशी असल्याने शनिवारी आणि रविवारी दादर फुल मार्केट फुलून गेले होते.
सांगली, सातारा, जुन्नर, कर्नाटक, नाशिक, बंगळूर आणि कोल्हापूर या शहरांतून मुंबईच्या दादर आणि फूल मंडईत फुलांचा पुरवठा केला जातो. फुलांच्या खरेदीमध्ये झेंडू, गुलाब, शेवंती आणि विविध सजावटीच्या फुलांची मागणी सध्या वाढली आहे. दुष्काळजन्य परिस्थिती असली आणि फुलांचा भाव जरी वाढला असला तरी लोकांचा उत्साह कायम आहे. मुसळधार पावसामुळे आवक कमी झाल्याने मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांत झेंडूचे दर ८० ते १२० रुपये प्रति किलो आहेत. चांगल्या प्रतीच्या शेवंतीला १५० ते २०० रुपये प्रति किलो एवढा भाव मिळत आहे. सणात सजावटीसाठी आणि हारांसाठी निशिगंधांच्या फुलांना मोठी मागणी असल्याने याचे दर २५० ते ३०० रुपये प्रति किलोवर गेले आहेत. तसेच सणासुदीच्या दिवसांत आवक कमी राहिल्याने मोगऱ्याने १,००० रुपये प्रति किलोचा टप्पा पार केला आहे.
दिवाळी, लक्ष्मीपूजन आणि पाडव्यानिमित्त घरे, दुकाने व कार्यालयांच्या सजावटीसाठी झेंडूच्या माळा आणि इतर फुलांची मागणी अचानक वाढली आहे. तसेच तयार हारांच्या किमतीतही वाढ झाली आहे. फुलांचे भाव वधारल्याचा थेट परिणाम किरकोळ बाजारातील हारांच्या किमतींवरही झाला असून, लहान-मोठे हार दुप्पट किमतीत विकले जात आहेत. दरम्यान, घराबाहेर लावण्यात येणाऱ्या झेंडूच्या तोरणालाही मोठी मागणी आहे. झेंडूच्या एक मीटरपर्यंतच्या तोरणाची किंमत ५० ते ६० रुपये आहे, तर दुहेरी झेंडू तोरणाची किंमत साधारणपणे १०० ते १२० रुपयांपर्यंत आहे.
दरम्यान, मीनाताई ठाकरे फूल मंडई या घाऊक फूल बाजारातही झुंबड उडाली आहे. झेंडू, गुलछडी, शेवंती, अस्टर या फुलांना सर्वाधिक मागणी आहे. सर्वाधिक लक्ष्मी पूजनासाठी झेंडुच्‍या मागणीत वाढ झाली आहे. दसऱ्यानंतर फुलांच्या मागणीत वाढ होते. पावसाळा, उन्हाळा आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. चांगल्या दर्जाचा माल खूप कमी मिळाला आहे. शिवाय अवकाळी पावसामुळे फुलांवर नागाळी, करपा हे रोग पसरले आहेत. त्यामुळे ७० टक्के नुकसान झाले आहे. लक्ष्‍मीपूजनानंतर पाडव्यासाठी फुलांना आणखी चांगली मागणी राहणार असल्याचे मीनाताई ठाकरे फूल मार्केट मंडईचे अध्यक्ष अविराज पवार यांनी सांगितले.

झेंडूच्या फुलांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे यंदा दिवाळीसाठी फुलांची खरेदी कमी प्रमाणात केली आहे. दरवाढीमुळे नेहमीपेक्षा कमी फुलांवर समाधान मानावे लागत आहे.
- अतुल यादव, ग्राहक

दिवाळीमुळे बाजारात फुलांना मागणी चांगली आहे. दसऱ्याच्या तुलनेत यंदा दिवाळीत चांगला भाव मिळत असल्याने विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे.
- दीपक गुप्ता, फूलविक्रेता

असा आहे भाव
झेंडू - ५० ते ६० किलो
शेवंती - १००, १२०, १५० रुपये किलो
निशिगंधा- १०० रुपये किलो
मोगरा - ४०० रुपये किलो
सफेद शेवंती - १२० रुपये किलो
गुलाब (२० फुले) - ६० रुपये
तुकडा गुलाब - १२० रुपये किलो
गुलाब पाकळी - ६० ते ८० रुपये किलो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.