भिवंडीत फटाके विक्रीसाठी सहा ठिकाणे निश्चित

भिवंडीत फटाके विक्रीसाठी सहा ठिकाणे निश्चित
Published on: 

भिवंडी, ता. ८ (बातमीदार) : फटाक्यांमुळे होणारे वायू आणि ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी भिवंडी महापालिकेने कडक पावले उचलली आहेत. शहरात फटाके विक्रीसाठी सहा ठिकाणे निश्चित केली असून, आवश्यक परवाने आणि सुरक्षिततेच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या विक्रेत्यांनाच दुकान थाटण्याची परवानगी दिली जाणार आहे. विनापरवाना किंवा निर्धारित जागांव्यतिरिक्त फटाके विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि संभाव्य दुर्घटना लक्षात घेऊन अतिरिक्त आयुक्त नयना ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेचे संबंधित विभाग, पोलिस अधिकारी आणि फटाके विक्रेत्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत पर्यावरण, परवाना, अग्निशमन आणि पोलिस विभागाला फटाके विक्रीवर देखरेख ठेवण्यासह सुरक्षिततेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार फटाक्यांची विक्री आणि वापर करणे बंधनकारक आहे. तसेच, निर्धारित ध्वनी मर्यादेपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या फटाक्यांवरही निर्बंध आहेत. शाळा, रुग्णालये आणि शांतता क्षेत्रांजवळ फटाके फोडू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पर्यावरण संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नागरिकांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. बैठकीला उपायुक्त (परवाना विभाग) बाळकृष्ण क्षीरसागर, परवाना विभागप्रमुख स्नेहल पुणयार्थी, पोलिस व महापालिकेचे अधिकारी आणि फटाके विक्रेते उपस्थित होते.

निश्चित केलेल्या जागा
महापालिकेने फटाके विक्रीसाठी नजराना टॉकीज मैदान, कमला बिल्डिंग मैदान (पद्मानगर), छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंजूरफाटा येथील के. आर. हाईट्स इमारतीसमोरील मोकळी जागा, कामतघर गणपती विसर्जन घाट आणि भैरी बिल्डिंग (पद्मानगर) ही सहा ठिकाणे निश्चित केली आहेत. शहरात सुमारे ५० विक्री स्टॉलना परवानगी देण्याचे नियोजन आहे. दुकान सुरू करण्यापूर्वी विक्रेत्यांना आवश्यक परवाने घेण्याबरोबरच अग्निशमन आणि पोलिस विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवणे बंधनकारक आहे. प्रत्येक दुकानाबाहेर अग्निशमन उपकरणे ठेवणे आणि परिसरात स्वच्छता राखणेही आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.