भूलतज्ज्ञाला सहा वर्षांचा कारावास

भूलतज्ज्ञाला सहा वर्षांचा कारावास
Published on: 

भूलतज्ज्ञाला सहा वर्षांचा कारावास
गुन्ह्याची कबुली; ‘इसिस’ कटप्रकरणी न्यायालयाचा निकाल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या २०२३ मधील कटाशी संबंधित प्रकरणातील आरोपी भूलतज्ज्ञाने गुन्हाची कबुली दिल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने दोषी ठरवून सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

चुकीच्या कृत्यांबद्दल आपल्याला पश्चात्ताप होत असून, स्वतःच्या भविष्यासाठी तसेच कुटुंबासाठी गुन्हा कबूल करीत असल्याचे आरोपी अदनानअली सरकारने विशेष एनआयए न्यायालयाला सांगितले होते, त्या पार्श्वभूमीवर न्या. अभय जोगळेकर यांनी अदनानला बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) आणि भारतीय दंड संहितेंतर्गत गुन्हेगारी कट रचणे व पुरावे नष्ट करणे, या आरोपांखाली दोषी ठरवले, न्यायालयाने अदनानची कबुली स्वीकारताना, त्याच्यावरील आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून, समाजात अशा प्रकारच्या कृत्यांना आळा बसवून एक संदेश जाणे आवश्यक असल्याचे नमूद केले आणि अदनानला दोषी ठरवून सहा वर्षांची शिक्षा सुनावली, अशा घटकांमुळे देशाची सुरक्षा धोक्यात येते. त्यामुळे अशा कृत्यांना थारा मिळता कामा नये, असेही न्यायालयाने अधोरेखित केले.

पडताळणीनंतर शिक्षेचा निर्णय
अदनानच्या अर्जाची छाननी केल्यानंतर, त्याने कोणताही दबाव, बळजबरी, धमकी, प्रलोभन किंवा अवाजवी प्रभावाशिवाय गुन्हा कबूल केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यानंतर, फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार, अदनानला दोषी ठरवले. तसेच, अशा समाजकंटकांमध्ये कठोर संदेश जाण्यासाठी अदनानला शिक्षा होणे, आवश्यक असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

प्रकरण काय?
अदनान आणि इतर आरोपींना ‘इसिस’च्या संबंधित कटाची माहिती उघड झाल्यानंतर अटक करण्यात आली. त्यांच्यावर प्रतिबंधित दहशतवादी संघटनेला सक्रिय पाठिंबा दिल्याचा आरोप होता. यावर्षी २५ जूनला आरोप निश्चितीच्या वेळी, अदनानने स्वतःला निर्दोष असल्याचे सांगितले होते, मात्र २८ ऑक्टोबरला त्याने न्यायालयात एक अर्ज दाखल करून, आपण गुन्हा कबूल करण्यास तयारी दर्शवली आणि मानवी दृष्टिकोनातून कायद्यानुसार मिळणारी किमान शिक्षा देण्याची विनंती केली होती, त्याला कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही. तथापि, तो कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. न्यायालयाने त्याला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी आणि कबुली दिल्यास होणारे कायदेशीर परिणाम समजून घेण्यासाठी सात दिवसांचा वेळ दिला होता, मात्र अदनानने तो निर्णयावर ठाम असल्याचे सांगून स्वेच्छेने गुन्हा कबूल करण्याची तयारी दर्शवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.