एसटीचा महिलांना दिलासा

एसटीचा महिलांना दिलासा
Published on: 

एसटीचा महिलांना दिलासा

३१ डिसेंबरपर्यंत कार्डची अट शिथिल

जव्हार, ता. ८ (बातमीदार) : एसटी प्रवासात महिलांना मिळणाऱ्या ५० टक्के भाडेसवलतीसाठी अनिवार्य केलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डची (एनसीएमसी) सक्ती ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे शनिवारपासून (ता. ७) कार्ड नसलेल्या महिलांनाही पूर्वीप्रमाणे अर्ध्या तिकिटात प्रवास करता येणार आहे. ऐन सणासुदीच्या काळात घेतलेल्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एसटी महामंडळाने १ ऑक्टोबरपासून महिलांच्या भाडेसवलतीसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य केले होते. मात्र, ग्रामीण भागात कार्ड नोंदणी, वितरण आणि सक्रिय करण्याच्या प्रक्रियेत अडचणी येत असल्याने अनेक महिला सवलतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाने ५ नोव्हेंबर रोजी आदेश काढत कार्डची सक्ती तात्पुरती शिथिल केली आहे.

जव्हार हा दुर्गम व ग्रामीण भाग असल्याने येथील अनेक महिला प्रशासकीय कामे, शिक्षण, रोजगार, आरोग्यसेवा आणि बाजारपेठेसाठी एसटीने प्रवास करतात. त्यामुळे या निर्णयाचा त्यांना फायदा होणार आहे. दरम्यान, महिलांची कार्ड नोंदणी पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे.