सोनोग्राफी मशीन डॉक्टरांअभावी धूळखात!

सोनोग्राफी मशीन डॉक्टरांअभावी धूळखात!
Published on: 

सोनोग्राफी मशीन डॉक्टरांअभावी धूळखात!
मुरबाड ग्रामीण रुग्णालयात दोन महिन्यांपासून सेवा बंद
मुरबाड, ता. ८ (बातमीदार) : शासनाने लाखो रुपये खर्च करून मुरबाड ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून दिलेले सोनोग्राफी मशीन तज्ज्ञ डॉक्टरांअभावी गेल्या दोन महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. रुग्णालयात अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन उपलब्ध असूनही ते चालवण्यासाठी कायमस्वरूपी तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने शासनाचा उद्देशच निष्फळ ठरत आहे. परिणामी ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाऱ्या गरीब व गरजू रुग्णांना सोनोग्राफीसाठी खासगी सेंटरचा आधार घ्यावा लागत असून, त्यासाठी १,२०० ते १,७०० रुपयांपर्यंत खर्च करावा लागत आहे.

मुरबाड तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातून अनेक रुग्ण उपचारासाठी मुरबाड ग्रामीण रुग्णालयात येतात. मात्र, डॉक्टरांच्या अभावामुळे रुग्णालयातील सोनोग्राफी सेवा बंद असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः पोटदुखी, विविध आजारांचे निदान तसेच गर्भवती महिलांच्या तपासण्यांसाठी सोनोग्राफी आवश्यक असताना रुग्णांना खासगी केंद्रांकडे धाव घ्यावी लागत आहे.

महिलांना गर्भधारणेदरम्यान प्रसूतीपूर्वी दोन ते तीन वेळा सोनोग्राफी करणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर खासगी तपासण्यांचा अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. शासनाने सार्वजनिक आरोग्य सुविधांसाठी लाखो रुपये खर्च करून मशीन उपलब्ध करून दिली असताना केवळ तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियुक्तीअभावी ते बंद राहणे ही गंभीर बाब आहे.

दरम्यान, मुरबाड तालुक्यातील टोकावडे आणि मुरबाड ग्रामीण रुग्णालयात शासनाकडून सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मात्र, जिल्हा रुग्णालयाकडून या मशीन चालवण्यासाठी कायमस्वरूपी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. स्थानिक स्तरावर डॉक्टरांची व्यवस्था करण्याचे आदेश असले तरी तज्ज्ञ डॉक्टर दररोज उपलब्ध होत नसल्याने सोनोग्राफी सेवेचा प्रश्न कायम आहे.

रुग्णांना फटका

भादाणे येथील प्रशांत हंडोरे यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याने डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार ते बुधवारी मुरबाड ग्रामीण रुग्णालयात गेले असता, सोनोग्राफी मशीन उपलब्ध आहे; मात्र ते चालवण्यासाठी प्रशिक्षित डॉक्टर नसल्याने तपासणी करता येणार नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. अखेर नाइलाजाने त्यांना खासगी सोनोग्राफी सेंटरमध्ये जाऊन १,२०० रुपये खर्च करून तपासणी करावी लागली.

कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती कधी?

याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी सांगितले, की मुरबाड ग्रामीण रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन चालवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, संबंधित डॉक्टर गेल्या दोन महिन्यांपासून रजेवर असल्याने सोनोग्राफी तपासण्या बंद आहेत. येत्या पंधरा दिवसांत डॉक्टर पुन्हा उपलब्ध होणार असून, ते आठवड्यातून केवळ एक दिवस रुग्णालयात येऊन सोनोग्राफी मशीन चालवणार आहेत. यामुळे आठवड्यातून केवळ एक दिवस उपलब्ध होणाऱ्या डॉक्टरांमुळे सर्व रुग्णांची गरज पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुरबाडसह टोकावडे ग्रामीण रुग्णालयातील सोनोग्राफी सेवा नियमित सुरू ठेवण्यासाठी शासन आणि आरोग्य विभागाने कायमस्वरूपी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.