

हटडी व्यवसायाला घरघर
पाच हजार वर्षांचा सांस्कृतिक वारसा धोक्यात
उल्हासनगर, ता. ८ (वार्ताहर) : दिवाळीच्या प्रकाशात सिंधी संस्कृतीची परंपरा उजळवणाऱ्या ‘हटडी’ कारागिरांच्या आयुष्यात मात्र आर्थिक संकटाचा अंधार पसरला आहे. पिढ्यान्पिढ्या हा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या गुजरातमधील वाघरी समाजाच्या कारागिरांना मेहनतीच्या तुलनेत योग्य मोबदला मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. वाढता उत्पादन खर्च आणि तुटपुंजा नफा यामुळे पुढील वर्षापासून हा पारंपरिक व्यवसाय बंद करण्याचा विचार कारागिरांकडून केला जात आहे.
सिंधी समाजाच्या दिवाळी उत्सवात लक्ष्मीपूजनाबरोबरच ‘हटडी’ पूजनाला विशेष महत्त्व आहे. व्यापारवृद्धी, सुखसमृद्धी आणि भरभराटीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या परंपरेचे नाते सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीच्या मोहेंजोदडो संस्कृतीशी जोडले जाते. सिंधी भाषेत ‘हट’ म्हणजे दुकान. नवजात बालकाच्या पहिल्या दिवाळीत त्याच्या नावाने हटडी स्थापन करून पूजन करण्याची प्रथाही समाजात आजही प्रचलित आहे.
ही परंपरा जिवंत ठेवण्यासाठी गुजरातमधील मेंशन गावातील वाघरी समाजाचे कारागीर दरवर्षी दिवाळीच्या दोन महिने आधी उल्हासनगरात दाखल होतात. माती, शेण, लाकडी पट्ट्या, बांबू, चुना आणि रंगीत कागदांचा वापर करून ते विविध आकारांच्या आकर्षक हटड्या तयार करतात, मात्र त्यांच्या कष्टाला अपेक्षित आर्थिक परतावा मिळत नसल्याची खंत आहे.
कारागीर रोहन दीपक उगरेच यांनी सांगितले की, त्यांचे आजोबाही अनेक दशकांपूर्वी हा व्यवसाय करण्यासाठी उल्हासनगरात येत होते. गेल्या १० वर्षांपासून ते स्वतः ही परंपरा पुढे नेत आहेत. सध्या छोटी हटडीची जोडी १०० रुपये, मध्यम आकाराची १५० ते २५० रुपये, तर मोठी जोडी ५०० रुपयांपर्यंत विकली जाते. साहित्याचा वाढता खर्च आणि मेहनतीच्या तुलनेत मिळणारा कमी नफा यामुळे व्यवसाय परवडेनासा झाला आहे.
कारागीर अजय राजेश वीर यांनी पुढील वर्षापासून हा व्यवसाय बंद करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले. संभाजी चौक ते भाटिया चौक मार्ग, कॅम्प दोनमधील टेलिफोन एक्स्चेंज परिसर तसेच छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलाखाली हे कारागीर अहोरात्र हटड्या तयार करत आहेत. शॉपकीपर असोसिएशनचे अध्यक्ष दीपक छतलानी यांनी कारागिरांना योग्य मोबदला मिळाला नाही, तर सिंधी समाजाचा हा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा लोप पावण्याची भीती व्यक्त केली.