

भूमिपुत्र एल्गारचा स्नेहमेळावा
वज्रेश्वरी (बातमीदार) : भूमिपुत्र एल्गार संघटनेचा दिवाळी स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. यावेळी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष तथा लेखक प्रमोद पवार यांच्या ‘डेअर टू फाईट’ पुस्तकाचे प्रकाशन संघटनेतील कार्यकर्त्यांच्या मातोश्रींच्या हस्ते करण्यात आले. मातृत्वाच्या सन्मानातून संघर्षामागील कुटुंबाच्या योगदानाची जाणीव करून देणारा हा उपक्रम लक्षवेधी ठरला. भाऊबीज सोहळ्यात महिला कार्यकर्त्यांचा सन्मान, पैठणी स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले. तसेच संघटनेच्या कार्यावर आधारित राज्यस्तरीय रील स्पर्धेत ७५ स्पर्धक सहभागी झाले होते. यात रोशन वाघे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
-----------------------------------------
राघोजी भांगरे जयंती उत्साहात
वज्रेश्वरी (बातमीदार) : आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती दक्ष नागरिक फाउंडेशन आणि पंचक्रोशीतील तरुणांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त राघोजी भांगरे चौकातील त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर फाउंडेशनच्या कार्यालयात प्रतिमापूजन करण्यात आले. या वेळी त्यांच्या इंग्रजांविरुद्धच्या संघर्षाची आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची माहिती देण्यात आली. नव्या पिढीने त्यांच्या शौर्य व देशभक्तीतून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाला डॉ. राजेंद्र भांगरे, सरपंच संचिताताई म्हस्कर यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी आणि तरुण उपस्थित होते.
----------------------------------------
युवकांना मतदानाचे धडे
कल्याण (वार्ताहर) : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने एसएसटी कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘विकसित भारत युवा संवाद’ हा मतदार जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी यात सहभाग घेतला. युवा आयकॉन मंशा खत्री यांनी मतदानाचे महत्त्व, मतदारांचे अधिकार आणि कर्तव्यांबाबत मार्गदर्शन केले. या वेळी संस्थापक अध्यक्ष डॉ. पुरस्वानी, प्राचार्य डॉ. दीपक गवादे यांच्यासह प्राध्यापक व मान्यवर उपस्थित होते.
---------------------------------------------
मुरबाडच्या ग्रामपंचायतींची पुरस्कारांत बाजी
टोकवाडे (बातमीदार) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कारांमध्ये मुरबाड तालुक्यातील सिंगापूर ग्रामपंचायतीने प्रथम, तर फांगुळगव्हाण ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावला आहे. सिंगापूरला ५० लाख, तर फांगुळगव्हाणला २० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. भिवंडी तालुक्यातील डाहोळे ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक मिळविला असून, तिला ३० लाखांचे बक्षीस जाहीर झाले आहे.
--------------------------------------
किन्हवलीत ग्रामीण रुग्णालयाची मागणी
शहापूर (वार्ताहर) : किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची मुंबईत भेट घेऊन निवेदन दिले. शहापूर उपजिल्हा रुग्णालय २६ किलोमीटर दूर असल्याने आपत्कालीन रुग्णांची गैरसोय होते. त्यामुळे किन्हवली परिसरातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी आरोग्य केंद्राची दर्जावाढ आवश्यक असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.