

तुर्भे, ता. ८ (बातमीदार) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही बाजारांतील सफाई कामगारांनी चालू केलेले आंदोलन शनिवारी (ता. ७) रात्री तात्पुरते स्थगित केले. ऐन दिवाळीच्या तोंडावर पाचही बाजारांतील स्वच्छता व्यवस्था विस्कळित झाली होती.
४ नोव्हेंबरपासून २७२ कंत्राटी कामगारांनी बोनसमधील त्रुटी आणि अन्य प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद चालू केले. त्यामुळे बाजार आवारातील स्वच्छता व्यवस्था विस्कळित झाली होती. त्याचा फटका व्यापाऱ्यांसह संपूर्ण बाजार व्यवस्थेला बसला. प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करून बाजारातील कचरा काही प्रमाणात उचलला; मात्र फळ आणि भाजी मार्केटमध्ये पुष्कळ प्रमाणात कचरा साचत असल्याने तो पूर्णपणे साफ करणे शक्य झाले नाही. परिणामी काही ठिकाणी कचरा साचून दुर्गंधी निर्माण होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. याप्रकरणी पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या सूचनेनुसार १७ किंवा १८ नोव्हेंबरला बैठक घेण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले असतानाही आंदोलन सुरूच राहिले होते. अखेर रविवारपासून चार दिवस प्रशासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने तसेच प्रशासनाच्या विनंतीनंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
एपीएमसीचे सचिव राजाराम धोंडकर यांनी कामगार विभागाच्या सूचनांनुसार कंत्राटदारांनी बोनस, महागाई भत्ता आणि अन्य देयकांची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. या प्रक्रियेत काही त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा धोंडकर यांनी दिला.