भगवतीसमोरील भूखंड मैदानासाठी खुला

भगवतीसमोरील भूखंड मैदानासाठी खुला
Published on: 

भगवतीसमोरील भूखंड मैदानासाठी खुला
नौपाड्यातील आरक्षित भूखंडावरील शाळेचा प्रस्ताव रद्द
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : नौपाड्यातील भगवती शाळेसमोरील महापालिकेचा आरक्षित भूखंड अखेर मुलांच्या खेळण्यासाठी खुला करण्यात आला आहे. या भूखंडावर नव्याने शाळा उभारण्याचा प्रस्ताव रद्द करण्यात आल्याने परिसरातील मुलांना आणि खेळाडूंना मैदानासाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या मागणीला यामुळे यश आले आहे.
या भूखंडासाठी आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी पाठपुरावा केला. स्थानिक नगरसेवक सुनेश जोशी, मृणाल पेंडसे आणि प्रतिभा मढवी यांनीही महासभेत नव्याने प्रस्ताव मांडून मैदानासाठी भूखंड खुला करण्याची मागणी केली होती. दिवाळीच्या मुहूर्तावर दोन्ही आमदार आणि स्थानिक नगरसेवकांच्या उपस्थितीत मैदान नागरिकांसाठी खुले करण्यात आले.
ठाणे महापालिकेच्या १९७२ च्या विकास आराखड्यात नौपाडा, विष्णुनगर येथील या भूखंडावर शाळा आणि खेळाच्या मैदानाचे आरक्षण होते. त्यानुसार १९९२ मध्ये येथे भगवती शाळा उभारण्यात आली, मात्र उर्वरित भूखंड मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी अनेक वर्षे प्रलंबित होती. त्यातच २०१९ मध्ये या भूखंडावर आणखी एक शाळा उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.
विशेष म्हणजे, संबंधित संस्थेकडून अनेक वर्षे या भूखंडावर कोणतेही बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे मोकळ्या जागेवर झाडाझुडपांची वाढ होऊन परिसराला रानमाळाचे स्वरूप आले होते. विषारी सापांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला होता. तसेच ‘गुडवील’ नामक संस्थेकडून महापालिकेला सुमारे १२ कोटी रुपये येणे असल्याची बाबही समोर आली होती.
या पार्श्वभूमीवर संभाव्य नवीन विकास आराखड्यात या भूखंडाचे आरक्षण खेळाच्या मैदानासाठी प्रस्तावित असल्यास पूर्वीचे शाळेचे आरक्षण रद्द करावे आणि जागा स्थानिक नागरिक, तरुण व खेळाडूंसाठी खुली करावी, अशी भूमिका नगरसेवकांनी महासभेत मांडली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर मैदान खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता हे खेळासाठी मैदान उपलब्ध झाले आहे.