मिनाक्षी शिंदेची दिवाळी पहाट एकाकी

मिनाक्षी शिंदेची दिवाळी पहाट एकाकी
Published on: 

मिनाक्षी शिंदेंची दिवाळी पहाट एकाकी
उपमुख्यमंत्र्यांसह शिंदे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : ठाण्यातील शिवसेनेच्या राजकारणात एकेकाळी प्रभाव असलेल्या मिनाक्षी शिंदे यांच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला यंदा पक्षातील प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवली. दरवर्षी मोठ्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांनीही हजेरी लावली नाही. विशेष म्हणजे, याच ठिकाणापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर झालेल्या ‘युवा जल्लोष’ कार्यक्रमाला मात्र खासदार, आमदार आणि महापौरांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या अनुपस्थितीमुळे मिनाक्षी शिंदे यांच्याबाबत पक्षात सुरू असलेल्या नाराजीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
ठाण्यातील चिंतामणी चौक येथे मिनाक्षी शिंदे यांच्याकडून दरवर्षी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यापूर्वी या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षातील अनेक वरिष्ठ नेते, स्थानिक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित राहत होते. यंदा मात्र एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाला येणे टाळले. पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. दुसरीकडे, जवळच झालेल्या ‘युवा जल्लोष’ कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र चव्हाण, महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्यासह अनेक आजी-माजी नगरसेवकांनी उपस्थिती लावली. त्यामुळे दोन्ही कार्यक्रमांतील उपस्थितीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.
प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यू प्रकरणानंतर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. या प्रकरणावरून विरोधकांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते. त्यानंतर मिनाक्षी शिंदे यांनी ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटक पदाचा राजीनामा दिला, मात्र राजीनामा देण्यास विलंब झाल्याची नाराजी पक्षातील काही कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे शिवसेना शिंदे गटाची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चाही पक्षात आहे. याप्रकरणी नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेत आधीच सोनाक्षी शिंदे यांच्यापासून अंतर ठेवले आहे, पण आता काल-परवापर्यंत त्यांची पाठराखण करणारे खासदार यांनीही दोन हात लांब राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर दिवाळी पहाट कार्यक्रमाला पक्षातील प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती त्यांच्या राजकीय एकाकीपणाची चर्चा वाढवणारी ठरली आहे.