

रहेजा गार्डनमध्ये आगीचे लोळ
आठ ते चौदाव्या मजल्यावर तांडव
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असताना वागळे इस्टेट येथील रहेजा गार्डनमधील कार्लाइल इमारतीला रविवारी रात्री भीषण आग लागली. इमारतीच्या आठव्या मजल्यावर लागलेल्या आगीने चौदाव्या मजल्यापर्यंत फैलाव केला. त्यामुळे वरच्या मजल्यांवरील काही कुटुंबे अडकल्याची माहिती समोर आली.
अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासह अडकलेल्या रहिवाशांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू केले. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरापर्यंत कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नव्हते. कार्लाइल ही तळमजला अधिक १७ मजल्यांची इमारत असून, रविवारी रात्री ८ वाजून ३१ मिनिटांनी आगीची वर्दी मिळाली. आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. दोन ब्रांटो वाहने, दोन अग्निशमन वाहने, एक वॉटर टँकर आणि दोन जम्बो वॉटर टँकरच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.
...
शिंदेंनी घेतली धाव
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, आमदार रवींद्र फाटक, पोलिस उपायुक्त प्रशांत कदम आणि स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने इमारतीतील अडकलेल्या रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.