

तीन वर्षांतच पदपथ, गटारांची फेरबांधणी
पालिकेच्या नियोजनाचा बोजवारा; नागरिकांना मनस्ताप
कांदिवली, ता. ९ (वार्ताहर) : मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत अवघ्या तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले पदपथ, गटारे आणि रस्ते पुन्हा तोडून नव्याने उभारण्याचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. कांदिवली पूर्वेतील आकुर्ली मुख्य मार्गावरील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे उद्यानासमोर ही कामे सुरू आहेत. वारंवार होणाऱ्या पुनर्बांधणीमुळे पालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत.
कांदिवली पूर्वेतील आकुर्ली मार्ग, ठाकूर व्हिलेज तसेच पश्चिमेकडील महावीर नगर परिसरात पदपथ आणि गटारे तोडून पुनर्बांधणी केली जात आहे. यापूर्वी फेव्हर ब्लॉक आणि कोबा पद्धतीने तयार केलेले पदपथ पुन्हा उखडण्यात आले आहेत. वारंवार होणाऱ्या खोदकामामुळे रस्त्यालगतच्या वृक्षांचेही नुकसान होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या कामात गटारांची रुंदी ४० सेंटीमीटरवरून ६० सेंटीमीटर करण्यात येत आहे, मात्र काही ठिकाणी दगड-मातीवरच सिमेंट, खडी आणि रेतीचा पातळ थर टाकून काम उरकले जात असल्याचा आरोप आहे. नव्याने बसवलेल्या लोखंडी जाळ्या पुन्हा काढण्यात आल्या असून, सिमेंटचे ठोकळे पदपथावर टाकून देण्यात आले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून काम बंद असल्याने नागरिकांना विशेषतः दिवाळीत गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
लाखो रुपये खर्चून उभारलेल्या सुविधा किमान पाच ते सहा वर्षे टिकणे अपेक्षित असताना, त्याच कामांची वारंवार पुनर्बांधणी होत आहे. त्यामुळे कामांचे योग्य नियोजन करून दर्जेदार बांधकाम करावे आणि रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
चौकट
नागरिकांच्या पैशांचा अपव्यय
‘‘नागरिकांसाठी उभारलेल्या सुविधा किमान पाच-सहा वर्षे टिकल्या पाहिजेत, असे सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे म्हणाले, मात्र त्याच कामांची दोन-तीन वेळा पुनर्बांधणी करून कोट्यवधी रुपये वाया घालवले जात आहेत. पालिकेने नागरिकांच्या पैशाचा योग्य वापर करून हा भोंगळ कारभार थांबवावा, असेही मत त्यांनी मांडले.
चौकट
गटारांची क्षमता वाढविण्याचा उद्देश
‘‘पर्जन्य जलवाहिन्यांची रुंदी ४० सेंटीमीटरवरून ६० सेंटीमीटर करण्यात येत आहे, अशी माहिती रस्ते विभाग अभियंता पी. चाकणे यांनी दिली. त्यांच्या मते यामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यास मदत होऊ शकते.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.