गृह राज्यमंत्र्यानी आदिवासीच्या घरी साजरे केले लक्ष्मीपूजन.

गृह राज्यमंत्र्यानी आदिवासीच्या घरी साजरे केले लक्ष्मीपूजन.
Published on: 

शासन दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी
आदिवासी शेतकऱ्याच्या घरी गृह राज्यमंत्र्यांचे लक्ष्मीपूजन

मोखाडा, ता. ९ (बातमीदार) : दुष्काळात शेतकऱ्यांनी निराश होऊ नये. शासन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, संकटातून दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायतराज, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण तसेच अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. मोखाडा तालुक्यातील हट्टीपाडा येथे त्यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करीत त्यांच्या बांधावर जाऊन सोमवारी (ता. ९) संवाद साधला.
हट्टीपाडा येथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांशी संवाद साधताना कदम म्हणाले, की भेटीचे नियोजन करण्यासाठी अवघे २४ तास मिळाले होते. मात्र, सहकारी आणि पाड्यातील ग्रामस्थांनी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला. दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाले असले, तरी आदिवासी समाजाने आपली समृद्ध संस्कृती जपत पाहुण्यांचे उत्साहात स्वागत केल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. शेतकरी पांडुरंग शिद यांच्या घरी त्यांनी लक्ष्मीपूजन केले. ‘‘तुम्हा सर्वांसोबत साजरी होत असलेली ही दिवाळी माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची दिवाळी आहे,’’ अशी भावना कदम यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांना दिवाळी फराळाचेही वाटप करण्यात आले.
दिवाळीचा आनंद साजरा करीत असतानाही शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे असल्याची जाणीव शासनाला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई करून त्यांना दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.
हट्टीपाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत त्यांनी प्रशासनाकडून माहिती घेतली. शासनाच्या प्राथमिक स्वरूपातील पाच हजार रुपयांच्या मदतीपैकी अनेक बाधित शेतकऱ्यांना मदत मिळाल्याची माहिती या वेळी देण्यात आली. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही पुढील चार दिवसांत मदत देण्यात येणार आहे. ई-केवायसी किंवा आवश्यक कागदपत्रांशी संबंधित तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी थेट पाड्यावर जाऊन विशेष शिबिर आयोजित करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
----------------
नुकसानभरपाईसाठी शासन प्रयत्नशील
‘‘मदतीसाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू नयेत. शेतकऱ्याने कार्यालयात येण्याऐवजी अधिकाऱ्यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या दारात पोहोचले पाहिजे,’’ असे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. प्राथमिक मदतीबरोबरच मुख्य नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठीही शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी शिवसेना पालघर जिल्हा संपर्कप्रमुख पांडुरंग पाटील, जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, मोखाडा नगराध्यक्ष व तालुकाप्रमुख अमोल पाटील, तहसीलदार रोहन शिंदे, तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित साबळे, नायब तहसीलदार डॉ. बाळाराम भला यांच्यासह अधिकारी, ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.