

सीगल पक्ष्यांचे आगमन
आगरदांडा, मुरूड किनाऱ्यावर परदेशी पाहुण्यांचे थवे; पर्यटकांना निसर्गाची अनोखी पर्वणी
मुरूड, ता. ९ (बातमीदार) : निळाशार समुद्र, रुपेरी वाळू आणि नारळी-पोफळीच्या बागांनी नटलेल्या मुरूडच्या किनारपट्टीवर आता परदेशी पाहुण्यांची चाहूल लागली आहे. हिवाळ्याच्या हंगामात दरवर्षी दाखल होणाऱ्या सीगल पक्ष्यांचे आगरदांडा, राजपुरी आणि मुरूड किनाऱ्यावर आगमन झाले आहे. शुभ्र पिसे, लालचुटूक चोच आणि लयबद्ध हालचालींनी पर्यटकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या पक्ष्यांच्या थव्यांमुळे समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. यंदा त्यांच्या आगमनाला विलंब झाल्याने स्थानिकांसह पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागली.
आगरदांडा समुद्रकिनाऱ्यासह एकदरा पुलापासून नबाब पॅलेसपर्यंतच्या सुमारे अडीच किलोमीटर विस्तीर्ण किनाऱ्यावर सकाळी आणि संध्याकाळी सीगल पक्ष्यांचे दर्शन घडत आहे. समुद्राच्या लाटांवर विहार करणे, आकाशात गिरक्या घेणे तसेच छोटे मासे आणि खेकडे पकडण्यासाठी झेपावणे अशा त्यांच्या सहजसुंदर हालचाली पर्यटकांना आकर्षित करतात. ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यान या पक्ष्यांचा किनारपट्टीवर मुक्काम असतो. थंडीच्या काळात खाद्य आणि अनुकूल अधिवासाच्या शोधात हे पक्षी स्थलांतर करतात.
नाशिक येथील लक्ष्मण नारायण झाल्टे हे दरवर्षी कुटुंबासह मुरूड समुद्रकिनाऱ्यावर सीगल पक्ष्यांचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी आवर्जून येतात. मुलांना या पक्ष्यांचे निरीक्षण करण्याची संधी मिळावी, यासाठीही पर्यटक किनाऱ्यावर गर्दी करतात.
स्थलांतराचे तीन मार्ग
ग्रीन वर्क्स ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. निखिल भोपाळे यांच्या माहितीनुसार, मध्य आशियाई, पूर्व आशियाई-ऑस्ट्रेलियन आणि पश्चिम आशियाई-पूर्व आफ्रिकन असे स्थलांतराचे तीन प्रमुख मार्ग आहेत. यंदा कोकण किनारपट्टीवर सीगल पक्ष्यांचे आगमन नेहमीपेक्षा कमी असल्याचे निरीक्षण आहे. त्यांचे आगमन उशिरा होत आहे की त्यांची संख्या घटली आहे, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.