

धुमसत्या कचऱ्याने कोंडला श्वास
उल्हासनगरातील डम्पिंग ग्राउंड अद्याप आगीच्या विळख्यात
उल्हासनगर, ता. ९ (वार्ताहर) : उल्हासनगरच्या गायकवाड पाडा येथील डम्पिंग ग्राउंडला रविवारी (ता. ८) लागलेली आग दोन दिवस उलटूनही धुमसत आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांतून सतत बाहेर पडणाऱ्या धुरामुळे परिसर धुराच्या विळख्यात सापडला असून, नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. आग विझविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असले, तरी परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने नागरिकांतून चिंता व्यक्त होत आहे.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाचमधील गायकवाड पाडा येथील डम्पिंग ग्राउंडला रविवारी सकाळी अकराच्या सुमारास भीषण आग लागली. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांसह पाण्याचे टँकर घटनास्थळी पाठविण्यात आले. मात्र, कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये आग धुमसत असल्याने ती विझवण्यात अडथळे येत आहेत. आगीमुळे निर्माण झालेल्या धुराने परिसरातील नागरिकांचा श्वास कोंडला आहे. धूर घरांमध्ये शिरत असल्याने रहिवाशांना खिडक्या, दारे बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
विशेष म्हणजे या डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपुष्टात आली असतानाही येथे कचरा साठविला जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या तीन शहरांसाठी बदलापूर येथे संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, हा प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी आणखी कालावधी लागणार असल्याने डम्पिंग ग्राउंडच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापौर ॲड. अश्विनी निकम यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.