

मुंबई, ठाण्यात प्रदूषणाची आतषबाजी
मुंबई, ता. ९ : न्यायालयीन निर्बंध आणि महापालिकांचे आवाहन दुर्लक्षून लक्ष्मीपूजनाला झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने साेमवारी मुंबई महानगर प्रदेश प्रदूषणाने झाकाेळले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलमध्ये अनेक ठिकाणी हवेच्या गुणवत्तेची खराब ते गंभीर श्रेणी नाेंदवली गेली. महापालिकांच्या आकडेवारीनुसार, ठाणे शहरात हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ९५ वरून १५०, तर मुंबईत वांद्रे रेक्लमेशन आणि कलानगर येथे हवा गुणवत्ता निर्देशांक २३१ नोंदविण्यात आला. वांद्रे पूर्व येथे सर्वाधिक २८४ एवढा निर्देशांक नोंदवला गेला. त्याचबरोबर फटाक्यांच्या आवाजाने ध्वनिप्रदूषणाची मर्यादाही ओलांडली.
मुंबईत लक्ष्मीपूजनाच्या रात्री पीएम २.५चे प्रमाण प्रतिघनमीटर १९२ मायक्रोग्रॅमपर्यंत पोहोचले. दुसऱ्या दिवशी वांद्रे रेक्लमेशन आणि कलानगर येथे हवा गुणवत्ता निर्देशांक २३१ नोंदविण्यात आला. विशेष म्हणजे, याच परिसरातील बांधकामस्थळांवरील प्रदूषण मोजणाऱ्या फलकांवर मात्र समाधानकारक हवा गुणवत्ता दाखविण्यात आली. त्यामुळे मोजमाप यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ठाण्यात हवेचा गुणवत्ता निर्देशांक ९५ वरून १५० वर पोहोचला. धूलिकणांचे प्रमाणही निर्धारित मर्यादेपेक्षा ५७ टक्क्यांनी अधिक नोंदविण्यात आले. महापालिकेच्या कासारवडवली, उपवन आणि कोपरी येथील निरीक्षण केंद्रांवरील नोंदीनुसार, दिवाळीपूर्वी हवेतील सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण ९८ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ते वाढून १५७ वर पोहोचले. निर्धारित १०० मायक्रोग्रॅमच्या मर्यादेपेक्षा हे प्रमाण ५७ टक्क्यांनी अधिक आहे. नायट्रोजन ऑक्साइडचे प्रमाण ३९ वरून ४२, तर गंधक डायऑक्साइडचे प्रमाण १६ वरून ३० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर झाले. या दोन्ही प्रदूषकांचे प्रमाण निर्धारित मर्यादेत असले, तरी त्यातील वाढ चिंताजनक आहे. कोपरी येथे रात्री ध्वनिप्रदूषणाची पातळी ८१.२ डेसिबलवर गेली.
------------------------
फटाक्यांमुळे रात्रीच्या शांततेचा भंग
फटाक्यांच्या आतषबाजीचा परिणाम ध्वनिप्रदूषणातही दिसून आला. कोपरी येथे दिवाळीपूर्वी दिवसा ६८.८, तर रात्री ५८.३ डेसिबल आवाजाची नोंद झाली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हे प्रमाण अनुक्रमे ८१.३ आणि ८१.२ डेसिबलवर पोहोचले. निवासी क्षेत्रासाठी दिवसा ५५ आणि रात्री ४५ डेसिबलची मर्यादा निश्चित असताना दोन्ही वेळच्या नोंदींनी ती ओलांडली. २०२४ मध्ये दिवाळीच्या दिवशी ध्वनीची पातळी ८६, तर २०२५ मध्ये ८९.२ डेसिबल होती. यंदा त्यात घट झाली असली, तरी ध्वनिप्रदूषणाची समस्या कायम आहे.
-----
नवी मुंबईत गंभीर परिस्थिती
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, नवी मुंबईत परिस्थिती अधिक गंभीर होती. सामान्यतः ९१ असणारा निर्देशांक ३११ ते ३५० पर्यंत, तर महापे आणि नेरूळ परिसरात ४५० पार गेला. पनवेलमध्येही प्रदूषणाची पातळी वाढली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या आतषबाजीमुळे निर्बंधांचे उल्लंघन झाले असून, प्रशासनाच्या नियंत्रण यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
----
ठाण्यात अंतर्गत भागांतील नोंद (स्रोत : एक्यूआय ॲप)
परिसर | कमाल हवा गुणवत्ता निर्देशांक
हिरानंदानी इस्टेट| ९२२
वेदांता कॉम्प्लेक्स| ७०३
पातलीपाडा | ५६३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.