

महापालिका प्रशासनाविरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी आक्रमक!
१५ हजार कोटींच्या कर्जावरून महायुतीत वादाची ठिणगी; १ डिसेंबरला महापालिकेवर धडकणार मोर्चा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ११ : राज्यात महायुतीचे सरकार असले तरी नवी मुंबई महापालिकेच्या १५ हजार कोटींच्या प्रस्तावित कर्जावरून सत्ताधाऱ्यांमध्येच जोरदार संघर्ष पेटला आहे. महापालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने थेट शड्डू ठोकला आहे. गेल्या १० वर्षांत खर्च केलेल्या हजारो कोटींच्या पै-पैचा हिशेब दिल्याशिवाय कर्जाचे प्रस्ताव मंजूर करू देणार नाही, असा आक्रमक इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. या मुद्द्यावरून येत्या १ डिसेंबरला महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्याची घोषणा राष्ट्रवादीने केल्याने नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
राज्यातील सर्वाधिक श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मानल्या जाणाऱ्या नवी मुंबई पालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कर, विकास शुल्क, बांधकाम परवानग्या आणि विविध महसुली स्रोतांतून दरवर्षी कोट्यवधींचा निधी जमा होतो. असे असतानाही विकासकामांच्या नियोजनाच्या नावाखाली तब्बल १५ हजार कोटी रुपयांचे महाकाय कर्ज घेण्याचा प्रशासकीय ठराव मांडण्यात आल्याचा दावा करीत राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रस्तावावर हल्लाबोल केला आहे. महापालिकेकडे स्वतःचे भक्कम उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध असताना १५ हजार कोटींच्या कर्जाची आवश्यकता का निर्माण झाली, कोणत्या विशिष्ट विकासकामांसाठी हे आर्थिक गणित मांडले जात आहे आणि या कर्जाची परतफेड कशी केली जाणार, असे थेट सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपस्थित केले आहेत. कर्ज घेण्यापूर्वी महापालिकेने २०१५ ते २०२५ या मागील १० वर्षांच्या कालावधीतील संपूर्ण खर्चाचा पारदर्शक लेखाजोखा जनतेसमोर मांडावा, अशी कडक अट पक्षाने प्रशासनासमोर ठेवली आहे. सार्वजनिक निधी हा नागरिकांच्या करातून जमा होतो. त्यामुळे त्या पैशांचा विनियोग कुठे आणि कशासाठी झाला, याची इत्थंभूत माहिती मिळणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. केवळ विकासाच्या चकचकीत गप्पा मारून अफाट आर्थिक तरतुदी करणे योग्य नाही, तर त्या खर्चातून शहराचा प्रत्यक्ष किती फायदा झाला हे स्पष्ट झाले पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे.
हजारो कोटी गेले कुठे?
मागील १० वर्षांत पालिकेच्या तिजोरीतून हजारो कोटी रुपयांची उधळण झाल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीने प्रशासकीय कारभारावर प्रश्नांची सरबत्ती केली.
२०१५ ते २०२५ या कालावधीत महापालिकेने नेमका किती निधी खर्च केला?
कोणत्या विभागाला आणि कोणत्या प्रभागाला किती निधी वितरीत करण्यात आला?
या काळात कोणत्या विकासकामांना मंजुरी दिली गेली, त्यापैकी प्रत्यक्ष पूर्ण झालेली कामे किती आणि अपूर्ण कामे किती?
संबंधित ठेकेदारांना किती रकमेची बिले अदा करण्यात आली आणि त्या कामांचा दर्जा काय आहे?
भविष्यात नवी मुंबईकरांवर कर्जाचा डोंगर?
१५ हजार कोटींचे कर्ज ही मोठी रक्कम आहे. या कर्जावर महापालिकेला दरवर्षी किती व्याज भरावे लागणार? कर्जाच्या परतफेडीचा कालावधी नक्की किती वर्षांचा असेल? आणि महापालिकेच्या रोजच्या उत्पन्नातील किती मोठा हिस्सा या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी बाजूला ठेवावा लागेल? यामुळे भविष्यातील इतर नागरी विकासकामांवर त्याचा काय विपरीत परिणाम होईल, याचा कोणताही स्पष्ट आराखडा प्रशासनाने सार्वजनिक केलेला नाही, याकडे राष्ट्रवादीने लक्ष वेधले आहे. सध्याच्या विकासकामांपोटी घेतलेल्या या कर्जाचा बोजा भविष्यात नवी मुंबईतील करदात्या नागरिकांवर आणि येणाऱ्या पिढ्यांवर पडणार नाही ना, अशी गंभीर भीती व्यक्त करण्यात येत आहे. विकासाला आमचा अजिबात विरोध नाही; परंतु विकासाच्या आड लपवून आर्थिक निर्णय घेताना उत्तरदायित्व आणि पारदर्शकता पाळलीच पाहिजे, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे.
होर्डिंगबाजीने वेधले लक्ष
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात ठिकठिकाणी लावलेल्या होर्डिंगनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘भविष्यातील कर्जमुक्ती हीच खरी दिवाळी’ असा संदेश देत महापालिकेच्या आर्थिक नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. शहराचा विकास करताना महापालिकेची आर्थिक स्वायत्तता टिकून राहिली पाहिजे, असा इशारा या माध्यमातून दिला आहे. तसेच याच होर्डिंगवर भ्रष्ट अधिकारी, ठेकेदार आणि राजकीय नेत्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ‘बचेंगे तो और लढेंगे’ असा आक्रमक नारा देत आपली भूमिका स्पष्ट करण्यात आल्याने या राजकीय वादाला आता अधिकच नाट्यमय वळण मिळाले आहे.
या सर्व मुद्द्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसने आता आरपारच्या लढ्याची तयारी केली आहे. १ डिसेंबरला नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर भव्य आणि धडक मोर्चा काढून प्रशासनाला घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याद्वारे मागील १० वर्षांच्या खर्चाचा हिशेब सार्वजनिक करा, कर्जाची गरज स्पष्ट कारणे आणि शहराच्या भविष्यातील आर्थिक नियोजनाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करा, अशी मागणी करणार आहे.
- भरत जाधव, अध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेस, नवी मुंबई
------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.