हसऱ्या चेहऱ्याआडचे वास्तव

हसऱ्या चेहऱ्याआडचे वास्तव
Published on: 

हसऱ्या चेहऱ्याआडचे वास्तव
प्रभादेवीत रांगोळीतून मानसिक आरोग्याचा संदेश; भावना समजून घेण्याचे आवाहन

प्रभादेवी, ता. ११ (बातमीदार) : दिवाळीच्या सणानिमित्त आकर्षक रांगोळ्यांच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर जनजागृती केली जात आहे. प्रभादेवी येथील चंद्रोदय महिला मंडळाच्या दिवाळी उत्सवात साकारण्यात आलेल्या एका विशेष रांगोळीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. ‘हसऱ्या चेहऱ्यामागे दुःख असू शकते’ हा संवेदनशील संदेश देत मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
दीपावलीनिमित्त मंगळवारी प्रभादेवी येथील चवन्नीगल्ली मैदानात चंद्रोदय क्रीडा मंडळाच्या महिलांनी दीपोत्सव साजरा केला. यात रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात आला.
या वेळी उद्योजक किसन सारंग, रेखा देवकर, महेंद्र कोठेकर, संतोष मोरजकर, संगीत पाटील, रत्नाकर चिरनेरकर, गजेंद्र घाग, हरीश कोठेकर, विलास कोठेकर, मंदार कोलगे, रंजना म्हात्रे आदी उपस्थित होते.
या रांगोळीत एका महिलेचा चेहरा दोन भागांत दाखवण्यात आला आहे. चेहऱ्याच्या एका बाजूला ताण, भीती, एकटेपणा, नकारात्मक विचार आणि मानसिक संघर्ष दर्शविण्यात आला आहे, तर दुसऱ्या बाजूला आशा, आत्मविश्वास, प्रेम, स्वप्ने आणि आनंद या सकारात्मक भावनांचे चित्रण करण्यात आले आहे. दोन्ही भावनांच्या मध्यभागी हृदयाचे प्रतीक साकारून मनाच्या भावविश्वाचे महत्त्व रांगोळीकार आयुषा हडपुडे हिने अधोरेखित केले आहे.
बाहेरून एखादी व्यक्ती हसतमुख आणि आनंदी दिसत असली, तरी तिच्या मनात दुःख, चिंता किंवा मानसिक तणाव असू शकतो. त्यामुळे केवळ व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून तिच्या मनातील भावना ओळखता येत नाहीत. प्रत्येकाने एकमेकांच्या भावना समजून घेणे, संवाद साधणे आणि मानसिक आधार देणे गरजेचे आहे, असा महत्त्वपूर्ण संदेश या रांगोळीतून देण्यात आला आहे.
शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. मनातील ताणतणाव व्यक्त करणे, सकारात्मक विचारांना प्राधान्य देणे आणि गरज पडल्यास मदत घेणे आवश्यक आहे, याची जाणीव या कलाकृतीतून करून देण्यात आली आहे. दिवाळीच्या रंगोत्सवात सामाजिक भान जपणारी ही रांगोळी नागरिकांसाठी विचार करायला लावणारी ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.