सिझेरियनच्या वाढत्या प्रमाणाला लगाम; प्रत्येक शस्त्रक्रियेचे त्याच दिवशी परीक्षण बंधनकारक, खासगी रुग्णालयांत ५९ टक्के, तर सरकारी रुग्णालयांत ३७ टक्के प्रसूती शस्त्रक्रियेद्वार

सिझेरियनच्या वाढत्या प्रमाणाला लगाम; प्रत्येक शस्त्रक्रियेचे त्याच दिवशी परीक्षण बंधनकारक, खासगी रुग्णालयांत ५९ टक्के, तर सरकारी रुग्णालयांत ३७ टक्के प्रसूती शस्त्रक्रियेद्वार
Published on: 

‘वाढत्या सिझेरियन’वर सरकारचा अंकुश
सरकारी रुग्णालयांत शस्त्रक्रियेचे परीक्षण बंधनकारक

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : नैसर्गिक प्रसूती शक्य आहे की शस्त्रक्रिया आवश्यक आहे, याचा निर्णय वैद्यकीय परिस्थितीनुसार घेणे अपेक्षित असते, मात्र राज्यात सिझेरियनद्वारे होणाऱ्या प्रसूतींचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय ठरले असून, आता सरकारी आरोग्य संस्थांमध्ये होणाऱ्या प्रत्येक पहिल्या आणि पुनःशस्त्रक्रियेचे परीक्षण बंधनकारक करण्यात आले आहे. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना त्याच दिवशी परीक्षणाचा अर्ज भरून शस्त्रक्रिया करण्यामागील वैद्यकीय कारण स्पष्ट करावे लागणार आहे.
आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या (एचएमआयएस) सप्टेंबर २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, सरकारी रुग्णालयांमध्ये झालेल्या एकूण प्रसूतींपैकी ३७ टक्के प्रसूती सिझेरियनद्वारे झाल्या आहेत, तर खासगी रुग्णालयांमध्ये हे प्रमाण तब्बल ५९ टक्के आहे. अनावश्यक शस्त्रक्रियांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने आता प्रत्येक सिझेरियनचे त्याच दिवशी परीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाने यासंदर्भात ३ नोव्हेंबरला आदेश जारी केला आहे. या व्यवस्थेच्या अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांवर सोपविण्यात आली आहे. रुग्णालयांना दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत जिल्हा अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवावा लागेल. त्यानंतर जिल्हा स्तरावरील एकत्रित अहवाल १० तारखेपर्यंत राज्य सरकारला सादर केला जाईल. मासिक माता व बाल आरोग्य बैठका आणि गुणवत्ता हमी समितीच्या बैठकांमध्येही या आकडेवारीचा आढावा घेतला जाणार आहे. खासगी डॉक्टरांनीही अशाच प्रकारे शस्त्रक्रियांचे परीक्षण करावे, असे आवाहन करण्याच्या सूचना महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांसह जिल्हा व शहर आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
...
कोठे, किती प्रमाण?
- मुंबईतील सरकारी रुग्णालयांत गेल्या काही वर्षांत २५ हजार दोन प्रसूतींपैकी १२ हजार ६५४ (५१ टक्के) प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे झाल्या, तर याच कालावधीत खासगी रुग्णालयांत २४ हजार ७४० प्रसूतींपैकी १४ हजार ६०६ (५९ टक्के) प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे झाल्या.
- नवी मुंबईत सरकारी रुग्णालयांत हे प्रमाण ४३ टक्के, तर खासगी रुग्णालयांत ५५ टक्के होते. ठाण्यात अनुक्रमे ३९ आणि ५८ टक्के प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे झाल्या.
- सरकारी रुग्णालयांमध्ये भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक ६४ टक्के प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे झाल्या. येथील तीन हजार ३८५ प्रसूतींपैकी दोन हजार १७४ शस्त्रक्रिया झाल्या. खासगी रुग्णालयांतही भंडारा जिल्हा ८६ टक्क्यांसह आघाडीवर आहे. येथील दोन हजार ८१२ प्रसूतींपैकी दोन हजार ४२० प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे झाल्या.
- राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या (एनएफएचएस) विविध टप्प्यांमधील आकडेवारीतही सिझेरियन प्रसूतींचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. सरकारी आरोग्य संस्थांमधील सिझेरियनचे प्रमाण चौथ्या सर्वेक्षणात १८.३ टक्के होते. सहाव्या सर्वेक्षणात ते वाढून २३.८ टक्क्यांवर पोहोचले. खासगी रुग्णालयांमधील हे प्रमाण पाचव्या सर्वेक्षणातील ३९.१ टक्क्यांवरून सहाव्या सर्वेक्षणात ४८.५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
...
कोणत्या परिस्थितीत शस्त्रक्रिया आवश्यक?
पूर्वी सिझेरियन झालेले असणे, मुदतपूर्व प्रसूती, बाळाची उलटी किंवा तिरकी स्थिती, जुळी गर्भधारणा, प्रसूतिपूर्व अतिरक्तस्राव आणि आईच्या श्रोणीच्या तुलनेत बाळाचे डोके मोठे असणे अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया आवश्यक ठरू शकते. वैद्यकीय कारणांमुळे केलेल्या शस्त्रक्रिया आणि अनावश्यक शस्त्रक्रिया यांतील फरक स्पष्ट करून माता आणि नवजात बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, हा सरकारचा उद्देश आहे.
...
प्राण वाचवण्यासाठी...
कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांच्या मते, काही महिला प्रसूतिकळा सहन करण्यास तयार नसल्याने कुटुंबीय शस्त्रक्रियेचा पर्याय स्वीकारतात. तसेच अनेक गर्भवती महिला सरकारी रुग्णालयांत उशिरा पोहोचतात. अशा वेळी माता आणि बाळाचे प्राण वाचवण्यासाठी सिझेरियन करणे आवश्यक ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.