

उल्हास नदीसाठी जनआक्रोश!
‘एक सही... संतापाची’ मोहीम; प्रदूषणाविरोधात बदलापूरकरांना एकजुटीचे आवाहन
बदलापूर, ता. ११ (बातमीदार) : उल्हास नदीच्या वाढत्या प्रदूषणाविरोधात नागरिकांचा आवाज बुलंद करण्यासाठी उल्हास नदी बचाव समितीने बदलापुरात ‘एक सही... संतापाची’ ही जनआक्रोश मोहीम हाती घेतली आहे. नदीपात्रात मिसळणारे रासायनिक सांडपाणी, वाढता कचरा आणि अलीकडेच मृतावस्थेत आढळलेले मासे यामुळे नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर सह्यांच्या माध्यमातून नागरिकांचा संताप आणि नदी संवर्धनाची मागणी प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा समितीचा प्रयत्न आहे.
बदलापूरमधून वाहणाऱ्या उल्हास नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असल्याबद्दल पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. नदीत सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी आणि कचऱ्यामुळे जलप्रदूषणाचा धोका वाढला आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून नदीपात्रात मासे मृतावस्थेत आढळल्याने नदीतील जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर झाला आहे. या प्रदूषणाचा परिणाम नदीच्या नैसर्गिक परिसंस्थेवरही होत आहे.
नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी केवळ तक्रारी आणि निवेदने देऊन उपयोग होणार नाही. नागरिकांचा व्यापक सहभाग आणि प्रशासनावर जनदबाव निर्माण होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने समितीने सह्यांची मोहीम आयोजित केली आहे. नदीचे प्रदूषण थांबवावे, नदीपात्राचे संरक्षण करावे आणि प्रभावी संवर्धन उपाययोजना राबवाव्यात, या मागण्यांना नागरिकांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न मोहिमेतून केला जाणार आहे.
१२ आणि १३ नोव्हेंबरला मोहीम
ही मोहीम १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत बदलापूर पश्चिम येथील बाजारपेठ परिसरात, पोलिस चौकीसमोर होणार आहे. नदीचे प्रदूषण हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न नसून नागरिकांचे आरोग्य, भविष्यातील जलसुरक्षा आणि पुढील पिढ्यांच्या भवितव्याशी निगडित विषय आहे. त्यामुळे बदलापूरकरांसह परिसरातील नागरिकांनी मोहिमेत सहभागी होऊन नदीच्या संरक्षणासाठी आपली सही नोंदवावी, असे आवाहन उल्हास नदी बचाव समितीने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.