विकासाचा मार्ग हिरवाईतून

विकासाचा मार्ग हिरवाईतून
Published on: 

रिंग मेट्रोसाठी २,८०० झाडांचे पुनर्रोपण
बाधित झाडांचे पुनर्रोपण करून हिरवाई जपण्याचा प्रयत्न

हेमलता वाडकर/सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : ठाणे शहरातील रिंग मेट्रोच्या कामामुळे बाधित झाडांचे पुनर्रोपण करून हिरवाई जपण्याचा प्रयत्न महामेट्रोकडून केला जात आहे. प्रकल्पात दोन हजार ८०० झाडांचे पुनर्रोपण, तर भरपाई म्हणून ३७ हजार नव्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे खारेगाव टोलनाक्याजवळ पुनर्रोपित केलेल्या ९० झाडांना नवीन पालवी फुटली आहे. पुनर्रोपित झाडांच्या सात वर्षांच्या संगोपनाची जबाबदारीही महामेट्रोने स्वीकारली आहे.
ठाणे शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. रस्त्यांवरील वाढती वाहतूक आणि गर्दीच्या वेळेतील कोंडी लक्षात घेता सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय वाढवण्याची आवश्यकता आहे. याच पार्श्वभूमीवर सुमारे २९ किलोमीटर लांबीचा आणि २२ स्थानकांचा अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो मार्ग प्रस्तावित आहे. ठाणे रेल्वे स्थानकासह मेट्रो मार्गिका चार आणि पाच यांच्याशी जोडणी साधण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.
सप्टेंबरमध्ये स्वामी जंक्शन ते प्रशांत कॉर्नरदरम्यान मानवी साखळी उभारून नागरिकांनी प्रकल्पाच्या आवश्यकतेबाबत आणि पर्यावरणीय परिणामांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पोखरण रोड क्रमांक दोन, पातलीपाडा आणि हिरानंदानी इस्टेट परिसरातही नागरिकांनी आंदोलन केले. विशेषतः रस्त्यांच्या दुभाजकांमधील झाडे, परिसरातील हिरवळ आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.

तीन हजार ३१९ झाडे बाधित
रिंग मेट्रोच्या कामात एकूण तीन हजार ३१९ झाडे बाधित होणार आहेत. यापैकी ५१९ झाडे तोडावी लागणार असून, २,८०० झाडे दुसऱ्या ठिकाणी हलवून त्यांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. याशिवाय भरपाई म्हणून ३७ हजार नव्या झाडांची लागवड करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी झाडे हटवण्याबरोबरच नव्याने हरित क्षेत्र वाढवण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.

पुनर्रोपणाचे आव्हान
मोठे झाड एका जागेवरून दुसरीकडे हलवायचे असल्यास झाडाची मुळे, फांद्या आणि त्याच्या वाढीची स्थिती लक्षात घेऊन प्रक्रिया करावी लागते. त्यासाठी प्रथम झाडांचे आवश्यक ट्रिमिंग केले जाते. मुळांना कमीत कमी धक्का लागेल याची काळजी घेत झाड बाहेर काढले जाते. त्यानंतर वाहतुकीच्या माध्यमातून ते नवीन ठिकाणी नेऊन पुन्हा जमिनीत लावले जाते. नव्या जागी माती, पाणी आणि आवश्यक निगा राखल्यानंतरच झाड पुन्हा रुजण्यास सुरुवात होते. रिंग मेट्रोच्या कामातही अशाच शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब केला जात असून, पुनर्रोपणानंतर वाढ आणि स्थिती यावरही लक्ष दिले जाणार आहे.

खारेगावमध्ये ९० झाडांना नवजीवन
ठाणे महापालिका आणि वन विभागाकडे झाडांसाठी जागेचा पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान, नाशिक महामार्गालगत खारेगाव टोलनाक्याजवळ जागा उपलब्ध झाल्याने तेथे पुनर्रोपणाचे काम सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत ९० झाडांचे पुनर्रोपण यशस्वीपणे करण्यात आले असून, या झाडांना आता नवीन पालवी फुटली आहे.

सात वर्षे झाडांची काळजी घेणार
महामेट्रोने पुनर्रोपित झाडांच्या देखभालीची सात वर्षांची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यासाठी ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे १८ कोटी ५० लाख रुपये अनामत रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामुळे झाडे लावल्यानंतर त्यांचे संगोपन आणि जगण्याची खातरजमा करण्यासाठी दीर्घकालीन जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. मेट्रो मार्गाचे काम कल्पतरू एजी जेव्ही कंपनीला देण्यात आले असून, त्यांच्यामार्फत पुनर्रोपणाचे काम केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.