

दिघोड्यातील वीजप्रश्न सुटणार
अंडरग्राउंड केबल आणि निधीची प्रतीक्षा
उरण, ता. ११ (वार्ताहर) : उरण तालुक्यातील दिघोडे आणि परिसरातील गावांचा वीजपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. दिघोडे येथे प्रस्तावित वीज उपकेंद्रासाठी ९ नोव्हेंबर रोजी जमिनीची मोजणी पूर्ण करण्यात आली. माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर आणि कुंदा ठाकूर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे सकारात्मक दिशा मिळाली आहे. आता उपकेंद्राच्या उभारणीसह भूमिगत वीजवाहिन्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दिघोडे आणि आसपासच्या गावांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने वीज मिळणे अशा समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. अखंडित वीजपुरवठा नसल्याने घरगुती कामांसह व्यावसायिक आणि शेतीविषयक कामांवरही परिणाम होत आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उरण विधानसभा अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर आणि महिला तालुकाध्यक्ष कुंदा वैजनाथ ठाकूर यांनी शासनदरबारी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. खासदार सुनील तटकरे आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही या विषयात लक्ष घातल्याचे वैजनाथ ठाकूर यांनी सांगितले.
मोजणीची प्रक्रिया पूर्ण
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार ९ नोव्हेंबर रोजी अतिरिक्त कार्यकारी अभियंता वैभव राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली भूकरमापकांनी जमिनीची मोजणी केली. या वेळी पोलिस प्रशासनाचे सहकार्य घेण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, कुंदा ठाकूर, उरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विकास गायकवाड, दिघोडेचे ग्रामपंचायत अधिकारी अमित दुलगन, धुतुम गावाध्यक्ष समाधान कटेकर यांच्यासह जयप्रकाश घरत, दीपक नाईक, प्रमोद शेळके, विशाल पाटील, आस्मक पाटील, मयूर पाटील, अमित पाटील, नितीन वाणी, राज म्हात्रे आदी उपस्थित होते.
भूमिगत वाहिन्यांचा आग्रह
दिघोडे परिसरातील वीजपुरवठा अधिक सुरक्षित आणि नियमित होण्यासाठी भूमिगत केबल टाकण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. सध्या पावसाळ्यात अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होते. अशा वेळी वीजवाहिन्यांचे नुकसान होऊन पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडतात. भूमिगत वाहिन्यांमुळे अपघातांचा धोका कमी होण्यासह वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पुढील कार्यवाहीकडे लक्ष
वीज उपकेंद्राचा प्रस्ताव प्रत्यक्षात येण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया, निधीची उपलब्धता आणि प्रत्यक्ष उभारणीची कार्यवाही पूर्ण होणे गरजेचे आहे. भूमिगत केबल टाकण्यासाठीही तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या लोकहिताच्या कामात कोणीही अडथळा निर्माण करू नये, तर सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन वैजनाथ ठाकूर यांनी केले आहे. उपकेंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर दिघोडे आणि परिसरातील गावांना नियमित वीजपुरवठा मिळण्याची अपेक्षा ग्रामस्थांना आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.