

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : शहराच्या टोलेजंग इमारतींची संख्या दिवसागणिक वाढत आहे. ५० ते ६० मजल्यांच्या इमारतींनी ठाण्याचे रूप पालटत असताना या इमारतींसह लाखो नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणाऱ्या अग्निशमन दलाची मात्र अक्षरशः वाताहत झाली आहे. आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी सज्ज हातच कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे. अग्निशमन दलात मंजूर ८३५ पैकी तब्बल ६६१ पदे रिक्त असल्याने अवघे १७४ कर्मचारी संपूर्ण शहराची अग्निसुरक्षा सांभाळत आहेत. त्यामुळे आता ६०१ पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून, लवकरच ही पदे भरण्यात येतील, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला.
अग्निशमन दलाच्या या दयनीय अवस्थेचे वास्तव रहेजा कॉम्प्लेक्समधील आगीच्या घटनेने पुन्हा समोर आणले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठाणे अग्निशमन दलाला मुंबईतील जवानांची मदत घ्यावी लागली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई अग्निशमन दलाची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. स्वतःचे अग्निशमन दल असतानाही दुसऱ्या शहरातील यंत्रणेवर अवलंबून राहण्याची वेळ ठाणे महापालिकेवर येणे, ही प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराची साक्ष देणारी बाब ठरली आहे.
शहरात नव्या गृहसंकुलांची भर पडत आहे. उंच इमारतींच्या बांधकामांना वेग आला आहे, मात्र त्याच तुलनेत अग्निशमन दलाची क्षमता वाढविण्याची तसदी प्रशासनाने घेतलेली नाही. महापालिकेच्या १४ अग्निशमन केंद्रांपैकी केवळ आठ केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. उर्वरित केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने उपलब्ध जवानांवरच कामकाजाचा अतिरिक्त भार पडत आहे. ५० मजल्यांपेक्षा अधिक उंचीच्या इमारती शहरात उभ्या राहत असताना अग्निशमन दलातील मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदे गंभीर बाब असल्याचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी निदर्शनास आणले, तर दुसरीकडे अतिरिक्त आयुक्त डॉ. नितीन राठोड यांनी भरती प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत वर्षअखेरीस सुमारे ६०० कर्मचारी सेवेत दाखल होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
होमगार्डमध्ये किमान तीन वर्षे सेवा केलेल्या आणि फायरमन पदासाठी आवश्यक शैक्षणिक, शारीरिक आणि इतर पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांसाठी फायरमन संवर्गातील पाच टक्के समांतर आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यानुसार एकूण १९ पदे होमगार्ड उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. या निर्णयामुळे रखडलेली भरती प्रक्रिया पुढे सरकली असून, लवकरच फायरमनची ३८१ पदे, सहाय्यक फायरमनची १३ पदे आणि चालक-यंत्रचालकांची २०७ पदे अशी ६०१ तर, अभियंता (इंजिनिअर) संवर्गातील १०७ पदे असे एकूण ७०८ पदांची भरती केली जाणार आहे.
तीन महिन्यांपासून निकाल रखडला
गावदेवी मंडईतील आगीच्या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलातील रिक्त पदांचा प्रश्न महासभेत ऐरणीवर आला होता. नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर तातडीने भरती प्रक्रिया राबविण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानुसार भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली, उमेदवारांची परीक्षाही घेण्यात आली, मात्र परीक्षा होऊन तीन महिने उलटले तरी निकाल जाहीर करण्याची प्रशासनाला अद्याप सवड मिळालेली नाही. मुलाखतींचे वेळापत्रकही जाहीर झालेले नाही.
विभागप्रमुखच नाही
अग्निशमन दलाची अवस्था केवळ मनुष्यबळापुरती मर्यादित नाही. विभागाचे सर्वोच्च पद असलेले मुख्य अग्निशमन अधिकारीपद अनेक वर्षांपासून रिक्त आहे. उपअग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांच्याकडे प्रभारी म्हणून विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
भरतीतील पदांचा तपशील
फायरमन ३८१
चालक-यंत्रचालक २०७
सहाय्यक फायरमन १३
अभियांत्रिकी विभाग १०७
कनिष्ठ अभियंता (नागरी) २४
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) १६
कनिष्ठ अभियंता (विद्युत) ४
स्थळ पर्यवेक्षक ६३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.