भटक्या कुत्र्यांचा उच्छाद!

भटक्या कुत्र्यांचा उच्छाद!
Published on: 

भटक्या कुत्र्यांचा उच्छाद!
मोखाडा-खोडाळ्यात नागरिक धास्तावले

मोखाडा, ता. ११ (बातमीदार) : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाला आळा घालण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर असतानाही मोखाडा तालुक्यात याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. मोखाडा आणि खोडाळा या प्रमुख बाजारपेठांमध्ये भटक्या कुत्र्यांचे कळप मुक्तपणे फिरत असून, नागरिक, व्यापारी आणि पादचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनाबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना जबाबदारी निश्चित करून दिली आहे. सार्वजनिक संस्था आणि गर्दीच्या ठिकाणी कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश असतानाही मोखाडा नगर पंचायत आणि खोडाळा ग्रामपंचायत हद्दीत प्रभावी कार्यवाही दिसत नाही. खोडाळा चौफुली परिसरातील मच्छी, चिकन आणि सुका मावरा विक्रेत्यांकडून मांसाचे उरलेले तुकडे, आतडी आणि रक्तमिश्रित पाणी थेट रस्त्यावर टाकले जाते. त्यामुळे या परिसरात दिवसभर भटक्या कुत्र्यांचे कळप जमा होतात. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना कुत्र्यांच्या हल्ल्याच्या भीतीने वावरावे लागत आहे. मोखाडा मुख्य बाजारपेठेतही अशीच परिस्थिती काही प्रमाणात आहे.

सडलेल्या अवस्थेतील कुत्र्यामुळे चिंता
खोडाळा बाजारपेठेत डोक्याचा भाग पूर्णपणे सडलेल्या अवस्थेतील एक कुत्रा सैरावैरा फिरत असल्याचे नागरिकांनी सांगितले. या कुत्र्याच्या आरोग्याची तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करणे गरजेचे असताना संबंधित यंत्रणांची निष्क्रियता नागरिकांच्या चिंतेत भर घालत आहे. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबरोबरच आरोग्याचा धोकाही निर्माण झाला आहे.

कचरा व्यवस्थापनासह निर्बीजीकरणाची गरज
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी केवळ कुत्रे पकडण्यापुरती कार्यवाही पुरेशी नाही. मांस-मच्छी विक्रेत्यांनी जैविक कचरा उघड्यावर न टाकता झाकण असलेल्या ड्रममध्ये जमा करावा, त्याची नियमित विल्हेवाट लावावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच शाळा, रुग्णालये आणि बस स्थानक परिसरात कुत्र्यांचा वावर नियंत्रित करण्यासाठी निर्बीजीकरण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याची आवश्यकता आहे.
-----------------------------------------------------------
भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताचे काम UAWS या प्राणी कल्याण संस्थेला देण्यात आले आहे. संबंधित संस्थेकडे आधीच कामाचा व्याप मोठा असल्याने मोखाडा नगर पंचायत हद्दीतील कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यास विलंब होत आहे.
- रितेश बैरागी, मुख्याधिकारी, मोखाडा नगर पंचायत
-----------------------------------------------------------
उघड्यावर कचरा टाकणाऱ्या व्यावसायिकांना अंतिम नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतरही नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले, मात्र प्रत्यक्ष कार्यवाही कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
- देवीदास दोंदे, ग्रामपंचायत अधिकारी, खोडाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.