सहा महिन्यांपूर्वी तीन लाखांत पाच वर्षांच्या मुलाचा सौदा !

सहा महिन्यांपूर्वी तीन लाखांत पाच वर्षांच्या मुलाचा सौदा !
Published on: 

सहा महिन्यांपूर्वी तीन लाखांत
पाच वर्षांच्या मुलाचा सौदा!
दिव्यात बालविक्रीचे आणखी एक प्रकरण उघड; सहा जणांविरोधात गुन्हा

पंकज रोडेकर / सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : मुंब्रा येथील २० दिवसांच्या बाळाच्या विक्रीचे प्रकरण ताजे असतानाच दिव्यात पाच वर्षांच्या मुलाची तीन लाख रुपयांना विक्री झाल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हा व्यवहार सहा महिन्यांपूर्वी झाला असल्याचे समोर आले आहे.
दिवा येथे राहणाऱ्या भालेकर दाम्पत्याला अपत्य नसल्याने ते मूल मिळविण्याच्या प्रयत्नात होते. याचदरम्यान त्यांचा संपर्क संबंधित टोळीशी आला. मुलासाठी पैसे देण्याची भालेकर यांनी तयारी दर्शविल्यानंतर त्यांना पाच वर्षांचे एक मूल दाखविण्यात आले. अखेर तीन लाख रुपयांचा व्यवहार करून सहा महिन्यांपूर्वी मुलाला भालेकर दाम्पत्याच्या ताब्यात देण्यात आले. गेल्या सहा महिन्यांपासून हे दाम्पत्य मुलासोबत राहत होते. मात्र, मुंब्रा येथील बाळविक्री प्रकरणाच्या तपासादरम्यान दिव्यातील या जुन्या व्यवहाराचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आणि आणखी एका बाळविक्री प्रकरणाचा पर्दाफाश झाला.
याप्रकरणी लक्ष्मी ठोंबरे (३०), अब्दुल सत्तार अन्सारी (४३) आणि मुलाला विकत घेणारे शिवराम भालेकर (५०) या तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य सूत्रधार प्रवीण साळुंखे याचा या प्रकरणातही सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. शिल्पा साठे, पांडुरंग धोत्रे आणि प्रवीण साळुंखे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिल्पा साठे आणि पांडुरंग धोत्रे हे दोघेही यापूर्वीच्या बाळविक्री प्रकरणात अटकेत असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांचा या गुन्ह्यात ताबा घेण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे.

मुख्य सूत्रधाराच्या अटकेकडे लक्ष
मुंब्रा आणि दिवा येथील बाळविक्रीच्या घटनांमध्ये प्रवीण साळुंखे याचे नाव समोर आले आहे. तो अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. त्याला अटक झाल्यानंतर या टोळीने आणखी किती बालकांची विक्री केली तसेच या रॅकेटचे जाळे किती व्यापक आहे, याबाबतचा उलगडा होण्याची शक्यता आहे.