

शिक्षण विभागाला राष्ट्रीय शिक्षण दिनाचा विसर
मौलाना आझाद जयंतीनिमित्त शासकीय कार्यक्रमही नाही
मुंबई, ता. ११ : देशाचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्ताने ११ नोव्हेंबर रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण दिनाचा राज्यातील शालेय शिक्षण विभागालाच विसर पडला आहे. राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या निमित्ताने कोणताही शासकीय कार्यक्रम अथवा देशाच्या पहिल्या शिक्षणमंत्र्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्याचा कार्यक्रमही करण्यात आला नसल्याने यावर शिक्षण क्षेत्रात नाराजी व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे राज्यात दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने शाळांमध्येही राष्ट्रीय शिक्षण दिनाचा कोणताही कार्यक्रम साजरा होऊ शकला नसल्याचे दिसून आले.
मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस हा २००८ पासून देशात राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो. राज्यातही या दिवशी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, मात्र यंदा या दिवशी शाळाा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना दिवाळीची सुट्टी सुरू असल्याने हा दिवस कोणत्याही शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये साजरा होऊ शकला नाही. यामुळे शालेय शिक्षण विभागाने नव्याने आदेश काढून शाळा सुरू झाल्यानंतर देशाच्या पहिल्या शिक्षणमंत्र्यांच्या नावाने साजरा होणारा राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा करावा, अशी मागणी राष्ट्रीय गणतंत्र पार्टीचे अध्यक्ष प्रल्हाद गवारे यांनी केली आहे, तर टिचर डेमोक्रॅटिक फ्रंटचे प्रवक्ते राजेश पंड्या यांनीही राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या निमित्ताने मुंबईसह राज्यात कोणत्याही ठिकाणी देशाच्या पहिल्या शिक्षणमंत्र्यांच्या प्रतिमांनादेखील अभिवादन करण्यात आले नसल्याने नाराजी व्यक्त करत यावर विभागाने नव्याने कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी केली आहे.
ऊठसूट उपक्रम सादर करण्याचे आदेश काढणाऱ्या शिक्षण विभागाला आपल्या देशाच्या पहिल्या शिक्षणमंत्र्याचाच विसर व्हावा, हे आश्चर्यकारक आहे. काही वर्षांपूर्वी अगदी धावत पळत आदेश काढून राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्याचे आदेश झाले, पण खुद्द शालेय शिक्षण विभागालाच याची जाणीव नसावी हे असंवेदनशीलतेचेच लक्षण मानावे लागेल.
- महेंद्र गणपुले, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.