गॅरेजला सदनिकेचा दर्जा नाही

गॅरेजला सदनिकेचा दर्जा नाही
Published on: 

गॅरेजला सदनिकेचा दर्जा नाही
सदस्यत्वाचा दावा करणाऱ्या महिलेची याचिका फेटाळली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ११ : महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यानुसार, केवळ निवासी सदनिकेच्या संदर्भातच सदस्यत्वाचा दावा केला जाऊ शकतो, असे निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच गॅरेज किंवा वाहनतळाची जागा निवासी सदनिकेच्या व्याख्येत मोडत नसल्याचेही स्पष्ट करून मलबार हिलस्थित वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकसित इमारतीतील एका महिलेची याचिका फेटाळून लावली. 

न्या. संदीप मारणे यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला. प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकसित इमारतीत सुमारे ८,३०० चौरस मीटर बांधकामाची मागणी याचिकाकर्त्या गोवानी यांनी महिलेने केली होती. मलबार हिलस्थित प्रतिभा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या (आताची साईडेल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी) त्या सदस्य असल्याचा दावा केला होता. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नावावर या इमारतीत एक दुकान आणि २२ गाड्यांचे वाहनतळ गॅरेजसह संपूर्ण खालच्या मजल्यावरील पोडियम खरेदी केले होते आणि त्यांना सोसायटीचे समभाग प्रमाणपत्रही मिळाल्याचेही गोवानी यांनी याचिकेत म्हटले होते. तथापि, सोसायटी आणि विकासकाने त्यांच्या सदस्यत्वाचा विचार न करता त्यांच्या मालकीच्या जागेच्या मोबदल्यात कोणतीही पर्यायी जागा न देताच विकास आराखडा मुंबई महापालिकेकडे सादर केला होता. तसेच विकसकाला त्यांच्या दुकानांच्या आणि संपूर्ण खालच्या मजल्यावरील पोडियमच्या बदल्यात योग्य बांधकामाची जागा राखून ठेवण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.  दुसरीकडे, सोसायटी आणि विकसकाने त्यांच्या मागणीला विरोध केला व गोवानी कधीही सोसायटीच्या सदस्य नसल्याचे आणि त्यांचे नाव वैधानिक नोंदवहीमध्ये कुठेही आढळत नसल्याचा युक्तिवाद केला. या नोंदणीशिवाय, समभाग प्रमाणपत्रांना कोणताही कायदेशीर अर्थ नसल्याचा दावा त्यांनी केला.

याचिकाकर्ता अल्पवयीन
गोवानी यांना समभाग प्रमाणपत्रे देण्यात आली, तेव्हा सोसायटीमध्ये कोणतीही वैध व्यवस्थापन समिती अस्तित्वात नव्हती, याचिकाकर्ता त्या १४ वर्षांच्या असल्यामुळे अल्पवयीन व्यक्ती सहकारी गृहनिर्माण संस्थेची सदस्य होऊ शकत नसल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले, त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.