नवी मुंबई देशात सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहर

नवी मुंबई देशात सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहर
Published on: 

नवी मुंबई देशात सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहर
राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ११ : ‘निश्चय केला, नंबर पहिला!’ हे ध्येय उराशी बाळगून गेल्या तीन-चार वर्षांपासून आखलेली नियोजनबद्ध रणनीती, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड, अधिकारी-कर्मचाऱ्यांची पराकाष्ठा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अहोरात्र राबणाऱ्या स्वच्छतादूतांसह नवी मुंबईकरांचा सक्रिय सहभाग या सर्वांच्या बळावर नवी मुंबई शहराने यशाचे महाशिखर गाठले आहे. केंद्र सरकारच्या शहरी गृहनिर्माण व विकास मंत्रालयाच्या वतीने ‘स्वच्छ भारत मिशन (शहरी)’अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’मध्ये नवी मुंबई महापालिकेने देशातील तब्बल ४,७५१ शहरांना मागे टाकत ‘सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहर’ या बहुमानावर आपले नाव कोरले.
नवी दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये आयोजित भव्य पुरस्कार प्रदान समारंभात देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी हा मानाचा पुरस्कार अत्यंत अभिमानाने स्वीकारला. या ऐतिहासिक प्रसंगी उपमहापौर दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे आणि शहर अभियंता शिरीष आरदवाड उपस्थित होते. या दिमाखदार सोहळ्याला केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर, राज्यमंत्री तोखन साहू, सचिव सत्येंद्र सिंग यांच्यासह नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे यांची प्रमुख उपस्थिती होती. हा ऐतिहासिक सन्मान स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना सुजाता पाटील म्हणाल्या, ‘‘नवी मुंबईतील प्रत्येक नागरिकासाठी हा क्षण अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा आहे. शहराची प्रथम नागरिक म्हणून राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारण्याचा बहुमान मला मिळाला, हे माझे भाग्य आहे. हा पुरस्कार मी समस्त नवी मुंबईकर नागरिक आणि शहराला चकाचक ठेवण्यासाठी दिवस-रात्र घाम गाळणाऱ्या आपल्या स्वच्छतामित्रांना व स्वच्छतासखींना मनापासून समर्पित करते.’’ उपमहापौर दशरथ भगत यांनीही या यशाचे श्रेय अहोरात्र झटणाऱ्या स्वच्छताकर्मींना देत आगामी काळात ‘सुगंधी शहर अभियाना’च्या माध्यमातून नवी मुंबई स्वच्छतेच्या क्षेत्रात आणखी नवे मानदंड प्रस्थापित करेल, असा विश्वास व्यक्त केला.
...
तंत्रज्ञानाला लोकसहभागाची साथ!
नवी मुंबईच्या या ऐतिहासिक यशामागची सूत्रे स्पष्ट करताना महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले, की नवी मुंबईने स्वच्छतेच्या कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची दिलेली जोड आणि त्याला मिळालेली लोकसहभागाची साथ याचा राष्ट्रीय पातळीवर सखोल विचार करण्यात आला. याच सातत्यपूर्ण कामगिरीमुळे नवी मुंबई आज देशात पहिल्या क्रमांकावर विराजमान झाली आहे.
नवी मुंबईने ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये स्थान मिळवण्यासोबतच ‘सप्ततारांकित कचरामुक्त शहर’ आणि ‘वॉटर प्लस’ हे प्रमाणपत्र आणि आपली ओळख कायम राखली आहे.
...
नवी मुंबईची ‘स्मार्ट’ सूत्रे
अत्याधुनिक कंट्रोल रूम : कचरा संकलन आणि वाहतुकीवर पूर्ण लक्ष ठेवण्यासाठी ‘इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर’ या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
कचरा प्रक्रिया व पुनर्वापर : ओल्या व सुक्या कचऱ्यावर वर्गीकरणानुसार सुयोग्य प्रक्रिया तसेच वस्त्र कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणारे देशातील पहिले यशस्वी केंद्र चालवणे
पाण्याचा पुनर्वापर : सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याच्या पुनर्वापरावर दिलेला विशेष भर
डिजिटल तक्रार निवारण : नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी ‘मायएनएमएमसी’ ॲप आणि ‘सिटीजन ग्रिव्हेन्स पोर्टल’चा प्रभावी वापर
प्लॅस्टिकबंदी व व्यापक मोहीम : प्लॅस्टिक प्रतिबंधात्मक कडक उपाययोजना आणि विद्यार्थी, युवक व नागरिकांच्या सहभागातून राबवलेले व्यापक स्वच्छता अभियान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.