

पनवेल, ता. १२ (बातमीदार) : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील शेती आणि पिकांच्या नुकसानीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी राज्याचे मंत्री आशीष शेलार यांनी शिरढोण गावात प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी आणि शेतीच्या सद्य:स्थितीची माहिती घेतली. शेतीचे झालेले नुकसान आणि पावसाच्या अनियमिततेमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता या भागातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट असल्याचे त्यांनी नमूद केले.
पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात शेती हा अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार आहे, मात्र पावसातील अनियमितता, पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पडलेले पावसाचे खंड आणि बदलत्या हवामानाचा परिणाम यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. अपेक्षित उत्पादन मिळण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
दरम्यान, दिवाळीनिमित्त शेलार यांनी पनवेलमधील ग्रुप ग्रामपंचायत कर्नाळा गावातील आदिवासी पाड्यालाही भेट दिली. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हक्काचे घर मिळालेल्या शेतकरी कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यांच्या घरात दिवाळीचा फराळ घेत सणाचा आनंद द्विगुणित केला.
या वेळी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेलचे महापौर नितीन पाटील, ‘भाजप’चे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल पंचायत समिती सभापती रंजना वासकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
बारा वर्षांनंतर दिवाळीचा आनंद!
मंत्री शेलार यांनी तब्बल बारा वर्षांनंतर दिवाळीनिमित्त ग्रामीण भागातील कुटुंबांसोबत सण साजरा केल्याचा विशेष आनंद व्यक्त केला. शासनाच्या योजनांमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात निर्माण होणारा आनंद जवळून अनुभवण्याची ही संधी ठरली. माणुसकीच्या नात्यांतून साजरी झालेली ही दिवाळी उपस्थितांसाठीही आनंददायी ठरली.
पनवेल : आशीष शेलार यांची शिरढोणमध्ये बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.