

दिवाळीनंतर पुन्हा स्थलांतर
रोजगारासाठी कातकरी कुटुंबांची शहरांकडे धाव
कासा, ता. १२ (बातमीदार) : दिवाळीचा सण कुटुंबीयांसोबत साजरा केल्यानंतर डहाणू तालुक्यातील कातकरी आदिवासी कुटुंबांनी पुन्हा रोजगारासाठी स्थलांतर सुरू केले आहे. दिवाळीनिमित्त आठवडाभर गजबजलेली गावपाड्यांतील घरे आता पुन्हा रिकामी होऊ लागली आहेत. उदरनिर्वाहासाठी मुंबई, ठाणे आणि गुजरातमधील विविध भागांकडे कुटुंबांची वाटचाल सुरू झाल्याने गावांमध्ये पुन्हा शुकशुकाट पसरू लागला आहे.
पूर्वी स्थानिक जमीनदार आणि व्यापारी मजुरांना कामावर नेण्यासाठी थेट गावात वाहने पाठवत असत, मात्र आता बस, टेम्पो आणि अन्य प्रवासी वाहनांच्या माध्यमातून अनेक कुटुंबे स्वतःच कामाच्या ठिकाणी पोहोचत आहेत. चारोटी नाक्यावरही स्थलांतरित मजुरांची वर्दळ वाढली असून, रोजगाराच्या शोधात बाहेर पडणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढत आहे.
स्थलांतरित कामगार राजेंद्र गोलिम यांनी सांगितले की, गेल्या आठ दिवसांत कुटुंबासोबत दिवाळीचा आनंद घेतला. घराची थोडीफार दुरुस्ती केली, पुढील दिवसांसाठी लाकूडफाटा गोळा केला. आता पत्नी आणि दोन मुलांसह पुन्हा रोजगारासाठी बाहेर पडत असल्याचे त्यांनी सांगितले.
कातकरी समाजाचे अभ्यासक रवींद्र भरकुंड यांनी गावातच कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली. केलेल्या कामाची मजुरी वेळेवर मिळाल्यास आदिवासी कुटुंबांचे स्थलांतर रोखता येऊ शकते. अन्यथा दरवर्षी दिवाळीनंतर गावपाडे असेच ओस पडत राहतील, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
दरवर्षी दिवाळीनंतर उदरनिर्वाहासाठी होणारे हे स्थलांतर रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर कायम आहे. यंदा कमी पावसामुळे अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी रोजगार हमी योजनेची कामे प्रभावीपणे राबवून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. आदिवासी कुटुंबांना गावातच काम आणि वेळेवर मजुरी मिळाल्यास हंगामी स्थलांतराला आळा बसू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.