

नवीन पनवेल, ता. १२ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील तळोजा, पाताळगंगा, नागोठणे, रोहा आणि उरण या औद्योगिक क्षेत्रांतील लाखो कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी पनवेल येथे स्वतंत्र व सर्व सोयींनीयुक्त कर्मचारी राज्य विमा योजना रुग्णालय उभारण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कामगार युनियनचे विनायक गांधी यांनी केली आहे.
जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतींमध्ये हजारो कारखाने कार्यरत असून, लाखो कामगार आणि सुरक्षा रक्षक आपले कर्तव्य बजावत आहेत. या कामगारांच्या वेतनातून दरमहा कर्मचारी राज्य विमा योजनेची वर्गणी नियमितपणे कपात केली जाते; मात्र त्याबदल्यात मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या असल्याने कामगारांना उपचारांसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
पनवेल हे रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार आणि महत्त्वाचे केंद्र असतानाही येथील कर्मचारी राज्य विमा आरोग्य केंद्रातून रुग्णांना पुढील उपचारांसाठी वाशी येथील रुग्णालयात पाठविले जाते. गंभीर आजार किंवा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना दूरवर प्रवास करावा लागणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पनवेलमधील नामांकित खासगी रुग्णालयांशी सामंजस्य करार करून विमाधारक कामगारांना स्थानिक पातळीवर मोफत उपचार उपलब्ध करून द्यावेत.
पनवेलमधील सध्याचे कर्मचारी राज्य विमा कार्यालय आणि आरोग्य केंद्र दोन मजली इमारतीत असून, तेथे उद्वाहकाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे वृद्ध, गंभीर आजारी रुग्ण तसेच चालण्यास असमर्थ असलेल्या रुग्णांना वरच्या मजल्यावर जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णांच्या सोयीसाठी सर्व वैद्यकीय सुविधा तळमजल्यावर उपलब्ध करून द्याव्यात किंवा इमारतीत तातडीने लिफ्टची व्यवस्था करावी, तसेच अनेक वर्षांपासून हे आरोग्य केंद्र भाडेतत्त्वावरील इमारतीत सुरू असल्याने शासनाचा मोठा निधी भाड्यापोटी खर्च होत आहे.
पनवेल येथे स्वतंत्र कर्मचारी राज्य विमा रुग्णालय मंजूर करणे, स्थानिक खासगी रुग्णालयांशी सामंजस्य करार करणे, सध्याच्या आरोग्य केंद्रात लिफ्टची सुविधा उपलब्ध करणे आणि स्वतंत्र रुग्णालयासाठी जागा निश्चित करणे या प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. त्यातही कामगारांच्या वेतनातून नियमितपणे विमा वर्गणी कपात होत असताना त्यांना त्यांच्या हक्काच्या आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागणे अन्यायकारक आहे. त्यामुळे पनवेलमध्ये स्वतंत्र रुग्णालय उभारण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी गांधी यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.