

छठपूजेसाठी घाटकोपर पूर्वेत १०० कृत्रिम तलावांची निर्मिती
१५ हजारांहून अधिक भाविकांसाठी जय्यत तयारी; पूजा, सुरक्षा आणि नागरी सुविधांचे चोख नियोजन
घाटकोपर, ता. १२ (बातमीदार) ः घाटकोपर पूर्व परिसरात छठपूजा महोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून, उत्तर भारतीय भाविकांच्या सोयीसाठी पंतनगर येथील प्रल्हाद केशव आचार्य अत्रे मैदानात तब्बल १०० कृत्रिम पूजा तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. दरवर्षी या महोत्सवात सहभागी होणाऱ्या १५ हजारांहून अधिक भाविकांची गर्दी लक्षात घेऊन यंदा महापालिका प्रशासनाकडून विविध सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. नगरसेविका राखी जाधव यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदा रविवार (ता. १५), सोमवारी (१६) या मैदानावर छठपूजा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. छठपूजेसाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याने त्यांना पूजा करताना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी कृत्रिम तलावांसह परिसरात आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
प्रत्येक कृत्रिम तलावाच्या परिसरात सुरक्षित फरसबंदी, रेलिंग आणि बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच अखंड पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, जनरेटर बॅकअप आणि उच्च दर्जाची प्रकाशयोजना उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांसाठी स्वतंत्र सुविधा, कपडे बदलण्याच्या खोल्या आणि स्वच्छतागृहांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त, सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही यंत्रणा तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय अग्निशमन दल, आपत्कालीन वैद्यकीय पथक, स्वच्छता कर्मचारी, कचरा व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण आणि वाहनतळाचेही नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे छठ पूजा महोत्सव शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि धार्मिक उत्साहात पार पडण्यास मदत होणार आहे.
कृत्रिम तलावांच्या निर्मितीमुळे नैसर्गिक जलस्रोतावरील ताण कमी होऊन पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागत आहे, अशी प्रतिकि्रया भाजपच्या नगरसेविका राखी जाधव यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.