घोडबंदरच्या कोंडीला पर्याय

घोडबंदरच्या कोंडीला पर्याय
Published on: 

भिवंडी, ता. १२ (बातमीदार) : घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर आणि वसईदरम्यानचा प्रवास अनेक वर्षांपासून त्रासदायक ठरत आहे. विशेषतः जड-अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे वाहनचालकांना गर्दीच्या वेळी दोन तासांपर्यंत प्रवास करावा लागतो. या कोंडीला पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याबरोबरच भिवंडीच्या यंत्रमाग आणि कापड उद्योगाला चालना देण्याची क्षमता असलेल्या गायमुख-पायगाव खाडी पुलाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर दोन तासांचा प्रवास अवघ्या १५ ते २० मिनिटांवर येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचण्यासह मालवाहतुकीचा वेग वाढून भिवंडीच्या आर्थिक विकासालाही हातभार लागणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) ९७५.५८ कोटी रुपये खर्चून हा पूल उभारण्यात येत आहे. गायमुख ते पायगावदरम्यान ६.५०९ किलोमीटर लांबीचा आणि २३.६ मीटर रुंदीचा हा पूल असेल. पुलाच्या पाण्याखालील आणि जमिनीवरील खांबांच्या पायाभरणीचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, प्रकल्पाचे एकूण बांधकाम सध्या अंदाजे २५ टक्के पूर्ण झाले आहे. २०२७ च्या अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यावर घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे.
सध्या ठाण्याहून वसईला भिवंडी, चिंचोटी आणि पायगावमार्गे जाणाऱ्या वाहनचालकांना घोडबंदर रस्त्यावरील घाटातून प्रवास करावा लागतो. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने गर्दीच्या वेळेत प्रवासासाठी दोन तासांपर्यंत वेळ लागतो. खाडीवरील पुलामुळे पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असून, दोन तासांचे अंतर १५ ते २० मिनिटांत पार करता येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.


अनेक वाहतूक प्रकल्पाशी जोडणी
मुंबई महानगर प्रदेशातील गायमुख-पायगाव खाडी पूल हा अनेक महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना जोडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. यामुळे कोस्टल रोड, विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर, दिवा-वसई रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग ४८ आणि अंजूर-चिंचोटी रस्ता यांच्यातील संपर्क सुधारेल. त्याचबरोबर नेहमी भिवंडी शहर आणि भिवंडी ग्रामीण भागावर येणारा वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे. पुलाच्या दोन्ही टोकांवरील सुधारित रस्ते जोडणीमुळे ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर आणि वसई येथील नागरिकांची वाहतूक सुलभ होण्याची अपेक्षा असून पश्चिम भागाचा संपर्क सुधारण्यास मदत होणार आहे.

यंत्रमाग, कापड उद्योगालाही फायदा
भिवंडीच्या यंत्रमाग आणि कापड उद्योगालाही या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. भिवंडी हे देशातील प्रमुख यंत्रमाग, औद्योगिक आणि मालवाहतूक केंद्रांपैकी एक आहे. सुधारित रस्ते जोडणीमुळे मालवाहू वाहनांची ये-जा अधिक सुलभ होईल. वाहतुकीसाठी लागणारा वेळ कमी झाल्यास व्यापारी आणि उद्योजकांना त्याचा लाभ मिळेल. मुंबई आणि अहमदाबादसह प्रमुख बाजारपेठांशी संपर्क सुधारल्याने भिवंडीतील कापड व्यवसायालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे हा पूल केवळ वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग न ठरता भिवंडीच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
- प्रकल्प खर्च : ९७५.५८ कोटी रुपये
- पुलाची लांबी : ६.५०९ किलोमीटर
- पुलाची रुंदी : २३.६ मीटर
- पायाभरणीचे काम : ९५ टक्के पूर्ण
- एकूण प्रकल्पाची प्रगती : २५ टक्के
- पूर्णत्वाचे उद्दिष्ट : २०२७ अखेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.