

मालाड, ता. १२ (बातमीदार) : मालाड पश्चिमेतील लिबर्टी गार्डन परिसरातील चाचा नेहरू उद्यानाची दुरवस्था झाली असून, या उद्यानाचा नव्याने विकास करून सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष चिकणे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिकेच्या पी-पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त, संबंधित अधिकारी तसेच स्थानिक आमदार अस्लम शेख यांना निवेदन दिले आहे.
चाचा नेहरू उद्यान हे परिसरातील नागरिकांसाठी विरंगुळ्याचे महत्त्वाचे ठिकाण आहे, मात्र पालिकेच्या दुर्लक्षामुळे उद्यानातील सुविधांची अवस्था बिकट झाली आहे. उद्यानातील जॉगिंग ट्रॅक उखडला असून, लहान मुलांसाठी असलेली खेळणी तुटली आहेत. तसेच पथदिवे बंद असल्याने उद्यानात अंधार पसरतो. या अंधाराचा फायदा घेत असामाजिक तत्त्वांकडून नशेखोरी केली जात असल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे.
या उद्यानात दररोज सकाळी आणि संध्याकाळी लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी, जॉगिंग आणि व्यायामासाठी येतात, मात्र मूलभूत सुविधांच्या अभावामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने उद्यानाची दुरुस्ती, डागडुजी करून सुशोभीकरण करावे, अशी मागणी चिकणे यांनी केली आहे.
अडचणींचा सामना
उद्यानातील जॉगिंग ट्रॅक उखडला असून, लहान मुलांसाठी असलेली खेळणी तुटली आहेत. तसेच विजेचे पथदिवे बंद पडल्याने उद्यानात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या दुरवस्थेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
उद्यानाकडे नागरिकांची पाठ
उद्यानातील मूलभूत सुविधांची दुरवस्था झाल्याने योगा, व्यायाम आणि फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या घटली आहे. खेळणी तुटल्यामुळे लहान मुलांनीही उद्यानाकडे पाठ फिरवली आहे. एकेकाळी नागरिकांच्या वर्दळीने गजबजणारे हे भलेमोठे उद्यान सध्या दुर्लक्षामुळे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे.
जवाहरलाल नेहरू यांच्या स्मरणार्थ हे उद्यान साकारण्यात आल्याने त्यांच्या प्रतिमेप्रमाणे पालिकेने उद्यानाची डागडुजी तसेच पुनर्विकास करावा.
- संतोष चिकणे, सामाजिक कार्यकर्ते
उद्यान विभागाच्या माध्यमातून लवकरच चाचा नेहरू उद्यानाची दुरुस्ती करण्यात येईल.
- योगेंद्र सिंग कच्चवा, उद्यान अधीक्षक, पी पश्चिम विभाग
मालाड : लिबर्टी गार्डन परिसरातील चाचा नेहरू उद्यानाची दुरवस्था झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.