

एमआयडीसीतील अंधारमय रस्ते ठरताहेत जीवघेणे!
पथदिवे बंद, झाडांच्या फांद्यांआड प्रकाश; रात्री महिला कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वाशी, ता. १२ (बातमीदार) ः दिघा ते शिरवणेपर्यंत पसरलेल्या टीटीसी औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांवर पसरलेल्या तीव्र अंधारामुळे कामगार, वाहनचालक आणि विशेषतः रात्र पाळीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्याने अपघातांचा धोका वाढला असून, काही ठिकाणी झाडांच्या फांद्यांमुळे दिव्यांचा प्रकाश रस्त्यापर्यंत पोहोचत नसल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
टीटीसी औद्योगिक वसाहतीत साडेचार हजारांहून अधिक लहान-मोठे उद्योग असून, सुमारे पाच लाख कर्मचाऱ्यांना येथे रोजगार मिळतो. बहुराष्ट्रीय कंपन्या, कॉल सेंटर आणि विविध औद्योगिक आस्थापनांमुळे या परिसरात दिवसरात्र वर्दळ असते, मात्र एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यांची सुधारणा झाली असली तरी अंतर्गत रस्त्यांवरील पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. दिघा, रबाळे, महापे, खैरणे, तुर्भे आणि शिरवणे परिसरात सुमारे दोन हजार पथदिवे आहेत. यापैकी महापे, रबाळे आणि खैरणे परिसरात जवळपास एक हजार, तर तुर्भे आणि शिरवणे परिसरात सुमारे ९५० पथदिवे बसविण्यात आले आहेत, मात्र यातील अनेक दिवे बंद अवस्थेत असल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यांवर अंधार पसरतो. पथदिव्यांची नियमित देखभाल दुरुस्ती होत नसल्याने ही समस्या कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तुर्भेतील सविता केमिकल्स आणि फायझर रस्त्यावर अत्याधुनिक पथदिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, हे दिवेही अनेकदा बंद असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
अंधाराचा फायदा घेऊन चोरीच्या घटनाही घडत असल्याचा आरोप खासगी कंपनीत कार्यरत असलेले रमेश सूर्यवंशी यांनी केला आहे. औद्योगिक परिसरात अनेक महिला कर्मचारी रात्री उशिरा कामावरून घरी परततात. अशा वेळी अंधारे रस्ते, बंद पथदिवे आणि निर्जन मार्गांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे.
तातडीने दुरुस्ती करावी!
एमआयडीसी प्रशासनाने अंतर्गत रस्त्यांवरील बंद पथदिव्यांची तातडीने दुरुस्ती करावी, झाडांच्या फांद्यांची छाटणी करून प्रकाशव्यवस्था सुरळीत करावी आणि नियमित देखभालीसाठी यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी कामगार आणि वाहनचालकांकडून होत आहे. यासंदर्भात एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता एस. पी. आव्हाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.