

समाजसेवा केंद्र कुलूपबंद
चार कोटींची इमारत सात वर्षांपासून वापराविना; महिनाभरात सुरू न केल्यास उपोषणाचा इशारा
पनवेल, ता. १२ (बातमीदार) : कामोठे येथील नागरिकांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सिडकोने सुमारे चार कोटी रुपये खर्चून सेक्टर २१ मध्ये उभारलेले समाजसेवा केंद्र गेल्या सात वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना विविध कार्यक्रमांसाठी खासगी सभागृहांचा खर्च करावा लागत आहे. हे केंद्र महिनाभरात नागरिकांसाठी खुले करावे, अन्यथा २ डिसेंबरपासून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा प्रहार संघटनेने दिला आहे. यासंदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदन दिले आहे.
कामोठे शहरात मंगलकार्य, सामाजिक मेळावे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र सभागृह उपलब्ध व्हावे, अशी नागरिकांची मागणी होती. त्यानुसार सिडकोने २०१८ मध्ये बहुउद्देशीय इमारतीचे बांधकाम पूर्ण केले, मात्र सात वर्षांनंतरही हे केंद्र नागरिकांसाठी खुले झालेले नाही. महापालिकेने या इमारतीत वैद्यकीय सेवा केंद्र आणि माहिती तंत्रज्ञान केंद्र सुरू केले असले, तरी नियोजित समाजोपयोगी सुविधा अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत.
इमारतीच्या तळमजल्यावर बहुउद्देशीय सभागृह, स्वयंपाकघर, कार्यालय आणि ग्रीन रूम आहे. पहिल्या मजल्यावर सांस्कृतिक वर्ग, बालकार्यशाळा व डॉक्टरांसाठी खोल्या, तर दुसऱ्या मजल्यावर इनडोअर खेळ, वाचनालय आणि कार्यशाळेची व्यवस्था करण्यात आली आहे. एवढ्या सुविधा असूनही त्यांचा लाभ नागरिकांना मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
पाठपुराव्यानंतरही प्रश्न कायम
एकता सामाजिक संस्थेसह विविध संस्था गेल्या पाच वर्षांपासून केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सुनील शिरीषकर यांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे. महिनाभरात केंद्र सुरू न झाल्यास २ डिसेंबर रोजी आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. या वेळी ॲड. अजय तापकीर, ॲड. मनोज टेकाडे, अजय कदम, राहुल तेलंग, पंकज मोहिते आणि अभिनव येलवे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.