आयआयटी मुंबईत राष्ट्रीय शिक्षण दिन उत्साहात साजरा; संशोधन क्षेत्रातील प्राध्यापकांचा गौरव

आयआयटी मुंबईत राष्ट्रीय शिक्षण दिन उत्साहात साजरा; 
संशोधन क्षेत्रातील प्राध्यापकांचा गौरव
Published on: 

आयआयटी मुंबईत राष्ट्रीय शिक्षण दिन उत्साहात
संशोधन क्षेत्रातील प्राध्यापकांचा गौरव

मुंबई, ता. १२ : आयआयटी मुंबई येथे गुरुवारी राष्ट्रीय शिक्षण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेतील प्राध्यापकांच्या उल्लेखनीय संशोधन कार्याचा आणि शैक्षणिक योगदानाचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला आयआयएम उदयपूरचे संस्थापक संचालक, ऑपरेशन्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट विभागाचे प्राध्यापक तसेच आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी प्रा. जनत शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी प्रा. कृथी राममूर्ती क्रिएटिव्ह रिसर्च पुरस्कार २०२५ आणि आयआयटी मुंबई संशोधन पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आले. यामध्ये संशोधन प्रकाशन, प्रभावी संशोधन आणि संशोधन प्रसार पुरस्कारांचा समावेश होता.
संस्थेचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी शिक्षण आणि संशोधन यांचा परस्परपूरक संबंध अधोरेखित केला. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वेगाने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण, अध्ययन आणि मूल्यमापनाच्या पद्धतींचा नव्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. जनत शाह यांनी शिक्षण म्हणजे केवळ उपलब्ध ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे नव्हे, तर अज्ञात गोष्टींचा शोध घेण्याची क्षमता असलेली मने घडवणे होय, असे मत व्यक्त केले.
संशोधन प्रकाशन पुरस्कार २०२५ प्रा. रुची आनंद, प्रा. जे. इंदू, प्रा. रोहित मनचंदा, प्रा. अर्पिता मोंडल, प्रा. अर्चना पै आणि प्रा. रामकुमार राजेंद्रन यांना प्रदान करण्यात आला.
------------------------------
प्रभावी संशोधनासाठी गौरव
महत्त्वपूर्ण संशोधन योगदान आणि त्याच्या प्रभावासाठी अर्थशास्त्र विभागाच्या प्रा. हरिप्रिया गुंडिमेडा आणि रसायनशास्त्र विभागाचे प्रा. गोपालन राजारामन यांना प्रभावी संशोधन पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात आले. संशोधन आणि ज्ञानाच्या प्रसारातील योगदानाबद्दल स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रा. टी. आय. एल्धो आणि ग्रामीण भागांसाठी तंत्रज्ञान पर्याय केंद्राचे प्रा. पंकज सेखसरिया यांना संशोधन प्रसार पुरस्कार प्रदान करण्यात आला.
----------------------------------
प्रा. मानस ठाकूर यांना क्रिएटिव्ह रिसर्च पुरस्कार
प्रतिष्ठेचा प्रा. कृथी राममूर्ती क्रिएटिव्ह रिसर्च पुरस्कार २०२५ संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्रा. मानस ठाकूर यांना प्रदान करण्यात आला. ‘कम्पायलर ऑप्टिमायझेशन’ या विषयावरील त्यांच्या सर्जनशील संशोधन कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.