

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : परिचारिका शिक्षणाच्या क्षेत्रात ठाण्याने राज्यात पहिला मान पटकावला आहे. राज्यातील पहिले शासकीय एम.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या परिसरात सुरू झाले आहे. महाविद्यालयाला मान्यता मिळाल्यानंतर पहिल्या शैक्षणिक सत्रातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच नियमित वर्ग सुरू होणार आहेत. त्यामुळे पदव्युत्तर नर्सिंग शिक्षणासाठी राज्यातील विद्यार्थ्यांसमोर शासकीय पर्याय उपलब्ध झाला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकारातून हे महाविद्यालय उभारण्यात आले आहे. आवश्यक पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय तयारी उपसंचालक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेत प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनीही सहकार्य केले. ठाणे जिल्ह्यात यापूर्वी जीएनएम, एएनएम, एलएचव्ही आणि मानसोपचार परिचर्या पदविका अभ्यासक्रम सुरू होते. बी.एस्सी. नर्सिंगलाही मान्यता मिळाली आहे. आता एम.एस्सी. नर्सिंगच्या प्रारंभामुळे ठाणे पदव्युत्तर नर्सिंग शिक्षणाचे केंद्र म्हणून उदयास येणार आहे. या महाविद्यालयातून उच्चशिक्षित आणि प्रशिक्षित परिचारिका घडणार असून, त्याचा फायदा सरकारी रुग्णालयांच्या आरोग्यसेवेला होणार आहे. विशेषतः ठाण्यात उभारण्यात येणाऱ्या ९०० खाटांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठीही प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
प्रत्येक शाखेसाठी विशेष परिचारिका!
मनोरुग्ण सेवा, अतिदक्षता विभाग आणि अतिविशेषोपचारासाठी प्रशिक्षित परिचारिकांची फळी उभारण्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे नियोजन आहे. वैद्यकीय शाखांनुसार स्वतंत्र विशेष परिचर्या अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती उपसंचालक डॉ. कैलास पवार यांनी दिली.
९०० खाटांच्या रुग्णालयासाठी कुशल मनुष्यबळ
ठाण्यातील प्रस्तावित ९०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय तसेच अमरावती आणि नाशिक येथील अतिविशेषोपचार रुग्णालयांसाठी प्रशिक्षित परिचारिकांची गरज आहे. पहिल्या तुकडीतील १० विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करून राज्याच्या आरोग्य सेवेत योगदान द्यावे, अशी अपेक्षा डॉ. कैलास पवार यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.