

‘स्वच्छ पुरस्कारावरून’ श्रेयवादाचे राजकारण
गणेश नाईकांच्या भूमिकेवर राजकीय वर्तुळात चर्चा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १२ : स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये नवी मुंबई महापालिकेने देशात प्रथम क्रमांक पटकावत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महापौर सुजाता पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले, मात्र या राष्ट्रीय सन्मानानंतर आता नवी मुंबईच्या राजकारणात श्रेयवादावरून चर्चा आणि मतभेदांना तोंड फुटले आहे.
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिकेच्या या यशाचे अभिनंदन केले, मात्र या यशाचे श्रेय आपल्या नेतृत्वाला आणि भाजपच्या सत्ताधाऱ्यांना देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या भूमिकेवर आता विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राज्यातील सर्व पालिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास विभागाच्या अखत्यारीत येतात. गणेश नाईक यांनी यापूर्वी अनेकदा नगरविकास विभागाच्या कामकाजावर आणि निर्णयांवर जाहीरपणे टीका केली आहे. त्यामुळे, ज्या विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते, त्याच विभागाच्या अखत्यारीतील महापालिकेला मिळालेल्या यशाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणे कितपत योग्य आहे, असा सवाल विरोधकांकडून आणि राजकीय विश्लेषकांकडून विचारला जात आहे. या प्रकरणामुळे भाजप आणि शिवसेनेतील स्थानिक पातळीवरील अंतर्गत राजकीय स्पर्धा पुन्हा एकदा समोर आल्याचे बोलले जात आहे. शहर स्वच्छतेत देशात अव्वल ठरल्याचा आनंद नागरिकांना असला तरी, या यशाचे राजकीय भांडवल न करता सर्व पक्षांनी शहराच्या विकासासाठी एकत्र यावे, अशी भावना नवी मुंबईकरांकडून व्यक्त होत आहे.
------------------------------------------
प्रशासकीय कालावधी आणि सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान
२०२५ मध्ये महापालिकेत प्रशासकीय राजवट होती. त्यामुळे हा पुरस्कार कोणत्याही एका राजकीय पक्षाचा किंवा नेत्याचा नसून, तो दिवस-रात्र कष्ट करणारे सफाई कर्मचारी, कचरा व्यवस्थापन यंत्रणा, महापालिकेचे अधिकारी आणि स्वच्छतेत सहभागी होणाऱ्या सामान्य नवी मुंबईकरांच्या सामूहिक मेहनतीचे फळ असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
------------------------------------------
स्वतःच्या खात्याकडे लक्ष देण्याची मागणी
वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे राज्याच्या वन खात्याची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी नगरविकास विभागाच्या अखत्यारीतील महापालिकेच्या पुरस्कारावर भाष्य करण्याऐवजी, वनसंवर्धन आणि वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी आपल्या खात्यामार्फत कोणते ठोस निर्णय घेतले, याची माहिती जनतेसमोर मांडावी, अशी अपेक्षाही काही वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
--------------------------------------------
काही वाईट झाले, तर नगरविकास विभागाने केले. चांगले काम केले, तर भाजप आणि त्यांच्या नेत्यांनी केले, हा दुटप्पीपणा आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी नाईकांकडून सोडली जात नाही, पण हे श्रेय सत्ताधाऱ्यांचे आणि त्यांच्या नेत्यांचे नसून रस्त्यावर काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आहे.
- किशोर पाटकर, नगरसेवक, शिवसेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.