

छठपूजेवरून बदलापुरात मनसे आक्रमक
उल्हास नदीपात्रातील भरावावरून प्रशासन धारेवर
बदलापूर, ता. १२ (बातमीदार) : उल्हास नदीपात्रात छटपूजेच्या तयारीसाठी टाकण्यात आलेल्या मातीच्या भरावावरून बदलापुरात राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छठपूजेच्या आयोजनाला विरोध करत आक्रमक भूमिका घेतली असून, नदीपात्रातील भरावाबाबत पालिका प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, महसूल विभागानेही या प्रकरणाची दखल घेत संबंधित जागेचा पंचनामा केला आहे.
‘महाराष्ट्रात मराठी सणांना प्राधान्य दिले जावे. बदलापुरात छठपूजा होऊ देणार नाही. त्यासाठी वाट्टेल ते करू,’ असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष निशांत मांडवीकर यांनी दिला. उल्हास नदीपात्रात कोणतीही परवानगी न घेता मातीचा भराव टाकण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले. नदीपात्रात छठपूजेसाठी घाट उभारण्यामागील कारण काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
स्थानिक परंपरा, मराठी सण आणि नदीपात्राच्या पर्यावरणाचा विचार न करता छठपूजेची तयारी केली जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवातील विसर्जनासाठी उल्हास नदीत बंदी घालून कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. त्याच धर्तीवर छठपूजेसाठीही पर्यायी व्यवस्था करावी आणि नदीचे प्रदूषण टाळावे, अशी मागणी मांडवीकर यांनी केली.
महिनाअखेरपर्यंत पालिका प्रशासनाकडून संबंधित कामाची माहिती, खुलासा आणि अंदाजपत्रक मागविण्यात येईल. त्यानंतर पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेतला जाईल, असे तहसीलदार अमित पुरी यांनी सांगितले. त्यामुळे हे प्रकरण आता प्रशासकीय चौकशीच्या कक्षेत आले असून, पालिका प्रशासनाच्या खुलाशाकडे लक्ष लागले आहे.
उल्हास नदीत अनधिकृत भराव टाकून छठपूजेसाठी घाट का उभारला जात आहे? गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात नदीतील विसर्जनावर निर्बंध घालण्यात आले होते. मग छठपूजेसाठीही पर्यायी व्यवस्था करावी. उल्हास नदी प्रदूषित होता कामा नये.
- निशांत मांडवीकर, शहराध्यक्ष, मनसे, बदलापूर
संबंधित जागेचा पंचनामा करण्यात आला आहे. महिनाअखेरपर्यंत पालिका प्रशासनाकडून या कामाची संपूर्ण माहिती, खुलासा आणि अंदाजपत्रक मागविण्यात येईल. त्यानंतर पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेतला जाईल.
- अमित पुरी, तहसीलदार, बदलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.