ठाणेकरांसाठी टँकरची धाव!

ठाणेकरांसाठी टँकरची धाव!
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : पावसाचे प्रमाण कमी, पाण्याची मागणी वाढल्याने महापालिकेच्या जलसाठ्यावर वाढता ताण अशा कोंडीत ठाणेकर सापडले आहेत. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण घटल्याने शहरातील पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. त्यातच आठवड्यातून एक दिवस पाणीकपात लागू करण्यात आल्याने नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. ऑक्टोबरपासून शहरात दररोज सरासरी ७५ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत असून, यासाठी ठाणेकरांना दररोज तब्बल ४४ हजार ५०० रुपये मोजावे लागत आहेत.

पाण्याची टंचाई लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने घरगुती वापरासाठी टँकर उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे. सर्वसाधारण सभेने निश्चित केलेल्या दरानुसार महापालिकेच्या टँकरमधून १० हजार लिटर पाण्याच्या एका फेरीसाठी वाहतुकीसह एक हजार रुपये आकारले जातात, तर खासगी टँकरमध्ये १० हजार लिटर पाणी भरण्यासाठी ७०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. निर्धारित दरापेक्षा अधिक पैसे आकारल्यास नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

महापालिकेच्या साकेत येथील टँकर भरणा केंद्रातून शहरातील नऊ प्रभाग समित्यांमध्ये दररोज सरासरी ७५ टँकर पाणी पाठवले जातात. यापैकी २० टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला जातो. उर्वरित ५५ टँकरसाठी नागरिकांना पैसे मोजावे लागतात. ३५ टँकरसाठी प्रत्येकी ७०० रुपये, तर २० टँकरसाठी प्रत्येकी एक हजार रुपये आकारले जातात. यानुसार खासगी पाणीपुरवठ्यासाठी दररोज ४४ हजार ५०० रुपयांचा खर्च ठाणेकरांच्या माथी पडत आहे.

घोडबंदरला वाढीव पाण्याची प्रतीक्षाच
टँकरच्या सर्वाधिक फेऱ्यांची मागणी घोडबंदर मार्ग आणि वर्तकनगर परिसरातून होत आहे. घोडबंदर परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी महापालिकेने मुंबई महापालिकेकडे दररोज ५० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाण्याची मागणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात केवळ पाच दशलक्ष लिटर वाढीव पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत हा पुरवठा अपुराच ठरत आहे.

२७ लाखांच्या शहराला ५९० दशलक्ष लिटरचा आधार
ठाणे शहरासाठी सध्या चार जलस्रोतांमधून दररोज सुमारे ५९० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. वाढती लोकसंख्या, पाण्याची वाढती मागणी आणि उपलब्ध साठ्यावरील मर्यादा यामुळे वितरण व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. पाणीकपात आणि टँकरचा आधार घेत महापालिका परिस्थिती हाताळत असली, तरी नागरिकांना मात्र पिण्याच्या आणि घरगुती वापराच्या पाण्यासाठी रोज आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.