

नवी मुंबईत बंदीचे आदेश हवेत
रात्रभर आकाशी फटाक्यांची आतषबाजी; पोलिसी कारवाई मात्र शून्य
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १३ : ठाण्यात फटाक्यांमुळे झालेल्या भीषण आगीच्या दुर्घटनांनंतर राज्य सरकारने रात्री उशिरापर्यंत फटाके फोडणे आणि हवेत उंच उडणाऱ्या (रॉकेट व आकाशी) फटाक्यांवर बंदी घालण्याचे सक्त आदेश जारी केले होते, मात्र या आदेशांना नवी मुंबईत सर्रास केराची टोपली दाखवण्यात आली आहे. बंदी असतानाही शहरात रात्रभर उंच उडणाऱ्या फटाक्यांची आतषबाजी सुरू होती, तरीही पोलिस आणि प्रशासनाने याप्रकरणी अद्याप एकही गुन्हा दाखल केलेला नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेजारील ठाणे शहरात फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे उंच इमारतींना आग लागण्याच्या गंभीर घटना घडल्या होत्या. याची दखल घेत राज्य सरकारने रात्री १० नंतर फटाके फोडण्यावर तसेच आकाशात उंच जाणाऱ्या फटाक्यांच्या वापरावर बंदी घातली होती. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता, मात्र गुरुवारी रात्री उशिरापर्यंत नवी मुंबईतील वाशी (सेक्टर १७ व २९), नेरूळ (पाम बीच रोड लगतचा परिसर), कोपरखैरणे, ऐरोली आणि खारघर (सेक्टर ७ व १२) या भागांत या नियमांचे उघडपणे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले. मध्यरात्र उलटून गेल्यानंतरही आकाशात उंच उडणारे फटाके फोडले जात होते. यामुळे ध्वनिप्रदूषण तर झालेच, शिवाय उंच इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. इतका प्रकार घडूनही नवी मुंबई पोलिसांनी याप्रकरणी एकाही व्यक्तीवर गुन्हा दाखल केलेला नाही. यासंदर्भात नवी मुंबई पोलिस आणि अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता झाला नाही.
अनेक ठिकाणी आगीच्या घटनांची नोंद
सानपाडा (सेक्टर ८) : येथील एका गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात पार्क केलेल्या दुचाकींवर उंच उडणाऱ्या फटाक्यांची ठिणगी पडल्याने तीन दुचाकी जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतल्याने आग इतर वाहनांपर्यंत पसरली नाही.
सीवूड्स (सेक्टर ४०) : एका उंच इमारतीच्या टेरेसवर ठेवलेल्या प्लॅस्टिक व इतर टाकाऊ साहित्यावर बाहेरून आलेले रॉकेट पडल्याने आग भडकली. रहिवाशांनी व अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
कोपरखैरणे (सेक्टर १४) : मुख्य रस्त्यालगत असलेल्या कचऱ्याच्या कुंडीला व सुक्या झाडाझुडपांना फटाक्यांमुळे आग लागून परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता, ज्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.