

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : ठाणेकरांच्या श्वासात रोज प्रदूषणाचा विषारी धूर जात आहे. प्रदूषित हवेत श्वास घेणे म्हणजे दिवसाला साडेतीन सिगारेट ओढण्याइतक्या धुराच्या संपर्कात राहण्यासारखे असल्याचा अंदाज समोर आला आहे. दिवाळीतील आतषबाजी संपूनही शहरातील प्रदूषण कमी झालेले नाही. त्यामुळे शहरातील हवेची स्थिती खालावली आहे. उलट तापमानात किंचित घट झाल्यामुळे हवेतील धुळी कणांमुळे वातावरण धुरकट झाले आहे. सध्या हवेत अतिसूक्ष्म ६२ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर धुलिकण असून मास्क लावण्याशिवाय पर्याय नाही, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.
नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून बहुतांश दिवस हवा प्रदूषणाच्या विळख्यात आहे. आज (ता. १३) सकाळी हवेचा गुणवत्ता निर्देशांक १९० वर पोहोचला, तर दुपारीही तो १५५ एक्यूआय होता. त्यामुळे ठाणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत असल्याचे नोव्हेंबरमधील आकडेवारीवरून स्पष्ट होते. ही आकडेवारी अमेरिकी मापनपद्धतीनुसार असून, त्या पद्धतीत १५१ ते २०० हा अस्वास्थ्यकारक हवेचा स्तर मानला जातो. शुक्रवारी दुपारी नोंदविलेल्या आकडेवारीनुसार, हवेतील अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण ६२, तर मोठ्या धूलिकणांचे प्रमाण १०६ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर होते. अतिसूक्ष्म धूलिकण श्वासावाटे फुफ्फुसांच्या आतील भागापर्यंत पोहोचू शकतात. त्यांचा दीर्घकाळ संपर्क आल्यास श्वसनसंस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. दमा, फुफ्फुसांचे विकार आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तींना अशा हवेत अधिक त्रास होण्याची शक्यता आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीही ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी सांगितले.
मंद वाऱ्यामुळे प्रदूषण कायम
शुक्रवारी शहरातील तापमान ३४ अंश सेल्सिअस होते. वातावरणात धुरकटपणा कायम होता. वाऱ्याचा वेग ताशी अवघा ६.५ किलोमीटर असल्याने प्रदूषक दूर पसरण्याची प्रक्रिया मंदावली होती. परिणामी, हवेत धूलिकणांचे प्रमाण टिकून राहण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. दिवाळीनंतरही प्रदूषणाची पातळी कमी होत नसल्याने बांधकामांमधील धूळ, रस्त्यांवरील धूलिकण, वाहनांचा धूर आणि औद्योगिक उत्सर्जन यांचा नेमका वाटा किती, याची तपासणी होणे आवश्यक आहे.
प्रदूषण रोखण्यासाठी कारवाई कधी?
शहरातील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत असताना ठाणे पालिकेच्या प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बांधकामांच्या ठिकाणी धूळ नियंत्रणाचे नियम पाळले जातात का, रस्त्यांची नियमित स्वच्छता होते का, वाहनांचा धूर आणि औद्योगिक उत्सर्जनावर नियंत्रण ठेवले जाते का, याची तपासणी आवश्यक असल्याचे पर्यावरण अभ्यासक रोहित जोशी यांनी सांगितले. नागरिकांना प्रदूषित हवेत श्वास घ्यावा लागत असताना महापालिका बांधकाम आणि विकासकामान मधून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कोणती ठोस पावले उचलणार, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
वाढते बांधकाम, विकास कामे, वाहनांमधून निघणारा धूर आणि कमी होणारी झाडे यामध्ये आता फटाक्यांच्या प्रदूषणाने भर घातली आहे. सध्या ठाण्यामध्ये जे वातावरण आहे, त्यामध्ये मोकळा श्वास घेणे घातक ठरू शकते. केवळ श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांनाच नव्हे, तर तरुण आणि लहान मुलांसाठी ही हवा घातक ठरू शकते. त्यामुळे शक्यतो घराबाहेर पडताना नाकातोंडावर मास्क लावावा.
- डॉ. कैलाश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक
नोव्हेंबरमधील प्रदूषणाचा आलेख (खासगी ॲपनुसार)
तारीख प्रदूषण निर्देशांक
१ नोव्हेंबर १५१
२ नोव्हेंबर १४६
३ नोव्हेंबर १३८
४ नोव्हेंबर १६१
५ नोव्हेंबर १५९
६ नोव्हेंबर १६१
७ नोव्हेंबर १५४
८ नोव्हेंबर १५३
९ नोव्हेंबर १७३
१० नोव्हेंबर १६९
११ नोव्हेंबर १५५
१२ नोव्हेंबर १४९
कुठे किती प्रदूषण?
परिसर निर्देशांक
वेदांत कॉम्प्लेक्स १६२
ठाणे पश्चिम १६१
नवीन म्हाडा वसाहत १६१
वागळे औद्योगिक वसाहत १६०
मानपाडा १५९
ढोकाळी पाडा १५५
हिरानंदानी इस्टेट १५४
पातलीपाडा १४७
ब्रह्मांड १४६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.