

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : शहरात आगीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, आज (ता. १३) दिवा आणि वागळे इस्टेट परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. दिव्यातील प्लॅस्टिक भंगार साहित्याला लागलेली आग तब्बल पाच तास धुमसत होती. तर वागळे इस्टेटमधील एका कंपनीतील मोटार पंप आणि संकल्प स्कूलमधील महावितरणच्या मीटर रुमलाही आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या तिन्ही ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवले.
दिव्यातील फडके पाडा परिसरात पॉलिटेक्निकल कॉलेजजवळील मोकळ्या जागेत प्लॅस्टिकच्या भंगार साहित्याला शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी सलग पाच तास प्रयत्न करून सकाळी आठ वाजता आग पूर्णपणे विझवली. दरम्यान, वागळे इस्टेटमधील रोड क्रमांक १६ वरील महाराष्ट्र मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत मोटार पंप मशीनला शॉर्टसर्किटमुळे किरकोळ आग लागली. अग्निशमन दलाने फायर एक्स्टिंग्विशरच्या मदतीने ती तातडीने विझवली. तिसऱ्या घटनेत पडवळ नगर येथील संकल्प स्कूलच्या तळमजल्यावरील महावितरणच्या मीटर रूममधील सर्व्हर बॅटरीला आग लागली. यामध्ये बॅटरी, इलेक्ट्रिक वायरिंग आणि मीटरचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लागलेली आग आटोक्यात आणली. या घटनांमुळे अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
---
उथळसरमधील बारला पहाटे आग
ठाणे : उथळसर नाका परिसरातील रेस्टॉरंट ॲण्ड बारला आज (ता. १३) पहाटे आग लागली. या आगीत रेस्टॉरंटच्या तळमजल्यावरील काउंटर, फ्रिज, टेबल-खुर्च्या, टीव्हीसह अन्य साहित्य जळून नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
उथळसर प्रभाग समिती कार्यालयाजवळ, नांदगावकर हाईट्सच्या बाजूला माय बार रेस्टॉरंट ॲण्ड बार ही एक मजली इमारत आहे. शुक्रवारी पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास या बारमध्ये आग लागल्याची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर राबोडी पोलिस, अग्निशमन दल आणि ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या आग विझविण्याचे प्रयत्न केले. सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
----
फटाक्यांमुळे विजेच्या खांबाला आगीच्या ज्वाळा
उल्हासनगर (बातमीदार) : शहरातील कॅम्प नंबर ३ मधील संतोष नगर परिसरात विजेच्या खांबाला फटाक्यांमुळे आग लागली. खांबातून सुरुवातीला जोरदार ठिणग्या उडू लागल्या आणि काही क्षणांतच आगीच्या ज्वाळा दिसू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख आदिनाथ पालवे, विजय चौरे यांनी पोलिस, महावितरण आणि अग्निशमन विभागाला कळविले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित परिसरातील वीजपुरवठा तातडीने खंडित केला. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळण्यास मदत झाली. फटाक्यांमुळे भरवस्तीत असलेल्या विजेच्या खांबाला आग लागल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. त्यामुळे नागरिकांवर काही काळ अंधारात काढण्याची वेळ आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.