सांडपाण्याच्या पुनर्वापरातून बचत

सांडपाण्याच्या पुनर्वापरातून बचत
Published on: 

सांडपाण्याच्या पुनर्वापरातून बचत
उद्याने, इमारतींसाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर
वाशी, ता. १३ (बातमीदार) : वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने सांडपाण्याच्या पुनर्वापराचे नियोजन केले आहे. प्रक्रिया केलेले पाणी उद्याने, हरितपट्टे, रस्त्यांवरील दुभाजक आणि पुनर्विकास प्रकल्पांतील इमारतींसाठी वापरण्यात येणार आहे. या उपक्रमातून दररोज सुमारे ५० लाख ७० हजार लिटर पिण्याच्या पाण्याची बचत होणार आहे. यासाठी सुमारे १३ कोटी ४८ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे.
शहरातील वाढत्या नागरीकरणामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे उपलब्ध पिण्याच्या पाण्याचा वापर अधिकाधिक नागरिकांसाठी करता यावा, या उद्देशाने सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यावर भर दिला जात आहे. कोपरखैरणे सेक्टर १४ येथील मलप्रक्रिया केंद्रातून वाशी विभागातील उद्याने, दुभाजक आणि हरितपट्ट्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर वाढणार आहे.
महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रांमध्ये प्रक्रिया केलेले पाणी सध्या उद्याने, हरितपट्टे, रस्त्यांवरील दुभाजक आणि एमआयडीसी परिसरातील विविध कामांसाठी वापरले जात आहे. कोपरखैरणे येथील टर्शरी ट्रीटमेंट प्रकल्पातील पाणी एमआयडीसीला पुरविण्यात येत आहे. तसेच कोपरखैरणे, घणसोली आणि ठाणे-बेलापूर मार्गावरील हरितपट्ट्यांसाठीही त्याचा वापर केला जात आहे.

पिण्याच्या पाण्यावरील ताण घटणार
वाशी सेक्टर १० येथे अमृत योजनेअंतर्गत सुमारे ४,८०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या वृक्षांसह उद्याने आणि रस्त्यांवरील हरितपट्ट्यांच्या देखभालीसाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरण्यात येणार आहे. यातून दररोज २७.७ लाख लिटर पाण्याची बचत अपेक्षित आहे. तसेच वाशीतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये स्वच्छतागृहांतील फ्लशिंग, हरितपट्टे आणि अन्य पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी प्रक्रिया केलेले पाणी पुरविण्यात येईल. यातून आणखी २३ लाख लिटर पाण्याची बचत होणार आहे.
सांडपाण्याचा पुनर्वापर वाढल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी कमी होण्यास मदत होणार असून, सार्वजनिक परिसराच्या देखभालीसाठी पर्यायी जलस्रोत उपलब्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.