खोडाळा पोलीस दुरक्षेत्राला आग

खोडाळा पोलीस दुरक्षेत्राला आग
Published on: 

खोडाळा पोलिस दूरक्षेत्राला आग

ग्रामस्थांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

मोखाडा, ता. १३ (बातमीदार) : खोडाळा येथील पोलिस दूरक्षेत्राच्या इमारतीला अचानक आग लागल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच दूरक्षेत्राच्या आवारात जप्त केलेली वाहने आणि पोलिस दप्तरातील महत्त्वाचे दस्तऐवज सुरक्षित राहिले. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत तातडीने आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. स्वातंत्र्यपूर्व काळातील या पोलिस दूरक्षेत्राची इमारत कौलारू असून, तिच्या छतावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गवत उगवते. दीपावलीच्या काळात एखाद्या फटाक्याची ठिणगी छतावरील गवतावर पडल्याने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे. आगीचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आगीची दुर्घटना लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पाणी, माती आणि उपलब्ध साधनांच्या मदतीने त्यांनी आग आटोक्यात आणली. त्यांच्या तत्परतेमुळे आग अधिक पसरली नाही आणि आवारातील जप्त वाहने तसेच महत्त्वाचे पोलिस दस्तावेज सुरक्षित राहिले.
दरम्यान, या घटनेमुळे खोडाळा पोलिस दूरक्षेत्राच्या इमारतीच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ब्रिटिश सरकारने १९०२ मध्ये बांधलेली ही इमारत आजही जुन्याच स्वरूपात असून, वेळोवेळी किरकोळ दुरुस्ती करण्यात आली असली तरी तिची अवस्था अत्यंत जीर्ण झाली आहे. छप्पर आणि भिंतींची पडझड होण्याची शक्यता असल्याने येथे वास्तव्यास असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनाच असुरक्षित इमारतीत काम करावे लागत असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन इमारतीची तातडीने दुरुस्ती करावी आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.