

उल्हास नदीपात्रात पालिकेचा भराव
महसूल विभागाची कारणे दाखवा नोटीस; सात दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश
बदलापूर, ता. १३ (बातमीदार) : शहराची जीवनवाहिनी असलेल्या उल्हास नदीपात्रात छटपूजेच्या तयारीसाठी मातीचा भराव टाकण्याचे काम कुळगाव-बदलापूर नगरपालिकेमार्फत सुरू असल्याचे महसूल विभागाच्या पाहणी अहवालातून समोर आले आहे. याप्रकरणी अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून सात दिवसांत खुलासा मागवला आहे. उल्हास नदी बचाव समितीनेही या भरावाबाबत आक्षेप घेतल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून बदलापूर परिसरातील उल्हास नदीपात्रात छठपूजेच्या तयारीसाठी जेसीबी आणि डम्परच्या सहाय्याने माती टाकून सपाटीकरणाचे काम सुरू होते. मोठ्या प्रमाणावर मातीचा भराव टाकला जात असल्याने पर्यावरणप्रेमी आणि उल्हास नदी बचाव समितीने याबाबत आक्षेप नोंदवला होता. मनसेनेही या प्रकाराविरोधात भूमिका घेत संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती.
तक्रारींची दखल घेत तहसीलदार अमित पुरी यांनी कुळगावच्या महसूल अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. १२ नोव्हेंबरला सादर झालेल्या अहवालात उल्हास नदीपात्रातील मातीचा भराव कुळगाव-बदलापूर नगरपालिकेमार्फत सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सुमारे ६० ते ७० ब्रास माती टाकण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
-----------------------
पालिकेला कारणे दाखवा नोटीस
महसूल विभागाच्या अहवालानंतर तहसीलदारांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. महाराष्ट्र गौणखनिज उत्खनन विनियमन नियम, २०१५ मधील तरतुदींनुसार या कामासाठी आवश्यक प्रक्रिया करण्यात आली आहे का तसेच संबंधित शासकीय यंत्रणांच्या परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, याबाबत खुलासा मागवण्यात आला आहे. त्यासंबंधीची कागदपत्रे नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुदतीत समाधानकारक खुलासा किंवा आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.