

‘एक सही...संतापाची’ मोहीम सुरू
नदीच्या रक्षणासाठी बदलापूरकरांचा संताप
बदलापूर, ता. १३ (बातमीदार) ः मराठी सणांच्या वेळी नियमांचे डोस पाजणाऱ्या प्रशासनाला छठपूजेच्या वेळी मात्र नियमांचा विसर पडला आहे का, असा सवाल उपस्थित करीत बदलापूरकर उल्हास नदीच्या रक्षणासाठी एकत्र आले आहेत. उल्हास नदी बचाव समितीच्या वतीने शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी बदलापूर पश्चिमेतील बदलापूर गाव रिक्षा स्टँडजवळ ‘एक सही... संतापाची!’ या मोहिमेला सुरुवात झाली.
गणेश विसर्जन आणि नवरात्रोत्सवावेळी नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी प्रशासन निर्बंध लादते, कृत्रिम तलावांची व्यवस्था करते आणि मराठी बांधवही त्याला सहकार्य करतात. मग छठपूजेच्या वेळी उल्हास नदीच्या काठावर भराव टाकून नियमांना बगल देण्याची मुभा कोणाच्या आदेशाने देण्यात आली? शहराची जीवनवाहिनी असलेल्या नदीचे पात्र अरुंद करून भविष्यातील प्रदूषणाचा धोका वाढविण्याचा अधिकार कोणी दिला, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
उल्हास नदी बचाव समितीने याप्रकरणी तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली असून, त्यानुसार पालिका प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या छठपूजा कार्यक्रमाचा आयोजक कोण तसेच नदीकाठावर भराव कोणी टाकला, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
-----------
उल्हास नदी बचाव समितीच्या माध्यमातून आम्ही तहसीलदारांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार पालिका प्रशासनाला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनाच याची माहिती नसेल, तर प्रशासनाला अंधारात ठेवून हे काम कोणी केले? या प्रकरणातील अधिकारी, राजकीय नेते आणि आयोजकांची चौकशी करून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करावेत.
- संगीता चेंदवणकर, पदाधिकारी, उल्हास नदी बचाव समिती
------------------
बदलापुरात मराठी बांधव मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. मराठी सण साजरे करताना पर्यावरणाच्या कारणास्तव प्रशासनाकडून विविध निर्बंध लादले जातात आणि आम्ही त्याला सहकार्य करतो. मात्र, धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीचे प्रदूषण होणार असेल, तर ते कदापि सहन केले जाणार नाही. प्रशासनाच्या या भूमिकेचा आम्ही जाहीर निषेध करीत असून, त्याच भूमिकेतून ‘एक सही... संतापाची!’ या मोहिमेत सहभागी झालो आहोत.
- जीवन सरूडकर, नागरिक, बदलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.