

चारकोप, गोराईतील चाळींचा समूह पुनर्विकास
३२ हजारांहून अधिक रहिवाशांना दिलासा; सरकारकडे प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : चारकोप आणि गोराईतील बैठ्या चाळींचा म्हाडा बांधकाम आणि विकास संस्थेच्या (सी ॲण्ड डीए) माध्यमातून समूह पुनर्विकास करणार असून, त्याबाबतचा प्रस्ताव आठवडाभरात राज्य सरकारला पाठवला जाणार आहे. या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिल्यानंतर पुनर्विकास प्रकल्पाबाबतचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करून विकसकाच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. येथे वास्तव्यास असलेल्या तब्बल ३२ हजार ४७६ रहिवाशांना याचा लाभ मिळणार आहे.
पश्चिम उपनगरातील चारकोप आणि गोराई येथील चाळींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. चारकोप येथे २१७ एकरांचा भूखंड असून, त्यावर बैठ्या चाळी असून त्यामध्ये जवळपास ११ हजार ९६२ घरे आहेत तसेच गाराई येथे १९४ एकरांच्या भूखंडावर २० हजार ५१४ घरे आहेत. ही घरे असलेल्या प्लाॅटचे २५० ते १००० हजार चौरस फुट एवढे क्षेत्रफळ आहे. या दोन्ही भूखंडांचा समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून विकास केला जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव म्हाडाच्या विशेष प्रकल्प कक्षाने तयार केला असून, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या मंजुरीनंतर आठवडाभरात गृहनिर्माण विभागाकडे पाठवला जाणार असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या प्रस्तावाची सखोल तपासणी करून राज्य सरकार त्याबाबत शासन निर्णय जारी करेल. त्यानंतर सखोल आराखडा तयार करणे, उच्चाधिकार समितीची मंजुरी घेणे आणि त्यानंतर सी ॲण्ड डीएच्या नियुक्तीसाठी निविदा काढणे हे सोपस्कार पार पडणार असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.